Satara politics : सातारा जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या मेढा नगरपंचायतीत अपेक्षेप्रमाणे भाजप ने नगराध्यक्षपदासह 11 जागा जिंकत वर्चस्व राखले; परंतु नगराध्यक्षपदासाठी त्यांना अखेरपर्यंत झुंज द्यावी लागली. अखेर भाजपच्या रूपाली वारागडे यांचा 46 मतांनी निसटता विजय झाल्याने नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत, गुलालाची उधळण केली.
मेढा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत रंगली. शिवसेना आक्रमकपणे निवडणुकीत उतरल्याने भाजपनेही सर्व आयुधांचा, पर्यायांचा वापर करत उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले, तरीही भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रूपाली वारागडे यांना 1616, तर सेनेच्या रेश्मा करंजेकर यांना 1570 मते मिळाली. अवघ्या 46 मतांनी भाजपच्या वारागडे विजयी झाल्या.
भाजपने 11, शिवसेना 5, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 1 जागेवर विजय मिळवला. याठिकाणी भाजपतर्फे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे आदी मातब्बरांसह स्थानिक पातळीवरील नेत्यांचे चांगले संघटन कायम ठेवले.
शिवसेनेने पालकमंत्री शंभूराज देसाई आणि नवी मुंबईचे संपर्कप्रमुख अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली मेढा नगरपंचायतीत शिवसेनेने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही शेवटच्या टप्प्यात पदयात्रा, गाठीभेटी घेत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही खरी लढाई भाजप विरुद्ध शिवसेना अशीच झाली.
शेवटच्या दिवसापर्यंत भाजप (BJP) व शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक चांगलीच गाजली. भाजपने दोन जागा अगोदरच बिनविरोध निवडून आणत 18 विरुद्ध शून्य असा एकतर्फी विजय मिळवण्याचा दावा केला होता; पण निकालानंतर शिवसेनेने चिवट प्रतिकार केल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीला एक जागा मिळाल्याने शहरात एकेकाळी सत्ता गाजवणाऱ्या पक्षाला अस्तित्व राखता आले आहे.
शिवसेनेचे (Shivsena) अंकुश कदम हे एकटे असतानाही त्यांनी ही निवडणूक ताकदीने लढण्याचा चांगला प्रयत्न केला. निवडणूक प्रचारादरम्यान सेनेच्या संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी विरोधकांना 18-0 होऊ देणार नाही, सेनेचा एकही उमेदवार निवडून नाही आला तर तालुक्याच्या राजकारणातून बाहेर पडेन, अशी घोषणा केली होती. मात्र कमी कालावधीतही त्यांनी सूक्ष्म नियोजन करीत कडवी झुंज देत 5 नगरसेवक निवडून आणले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.