

Shivsena Politics : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीनंतर जवळपास सर्वच नेते एकनाथ शिंदेंसोबत निघून गेले. त्यानंतर काही मोजकेच विश्वासू लोक अद्यापही ठाकरेंसोबत असले तरी त्यातला एक जण गळाला असून हा नेता आता भाजपत प्रवेश करणार आहे. या नेत्यानं आपला राजीनामा देखील ठाकरेंकडं सोपवला आहे. त्यानंतर आता उद्या त्यांचा भाजपत प्रवेश होईल अशी चर्चा सुरु आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील पहिल्या फळीतील जवळपास सगळे नेते शिंदेकडं असलेल्या शिवसेनेत गेले आहेत. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे महानगर प्रमुख राजू वैद्य हे उद्या किंवा परवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी तयारी सुरु केली असून वैद्य यांनी आपल्या महानगर प्रमुख या पदाचा राजीनामा देखील उद्धव ठाकरेंकडं सोपवला आहे. आजच त्यांनी राजीनामा दिला असून लवकरच ते भाजपवासी होणार आहेत.
दरम्यान, रेणुकादास ऊर्फ राजू वैद्य यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं की, "मी छत्रपती संभाजीनगर येथील महानगर प्रमुख म्हणून कार्यरत होतो. माझ्या वैयक्तिक कारणामुळं मी पक्षपदाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत तुम्ही व सर्व शिवसैनिकांनी वेगवेगळ्या विषयामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र!"
नुकताच राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपनं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. तसंच भाजपच्या साथीनं शिवसेना-राष्ट्रवादीसह महायुतीनं २२८ पैकी तब्बल २२१ नगराध्यपदांवर विजय मिळवला. यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा नेत्यांच्या पक्षांतराला सुरुवात झाली आहे. कालच ग्रामीण भागातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजू वैद्य हे पक्षांतर करणारे पहिले नेते ठरणार आहेत.