Tushar Doshi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara SP Leave : साताऱ्यात पुन्हा गोंधळ : SP सक्तीच्या की अर्जित रजेवर?; पवारांच्या नेत्याने तोफ डागली, हा तर तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार...

Shashikant Shinde Statement : शशिकांत शिंदे यांनी तुषार दोशी यांच्या रजेवर प्रश्न उपस्थित करत झेडपी राड्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली. गरज पडल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

Vijaykumar Dudhale

Satara, 30 March : सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर नाही, तर अर्जित रजेवर पाठविण्यात आले आहे. हा तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होतोय का? हे बघावं लागेल. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी जे जे दोषी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आहोत. तसेच, सभापती निवडीच्या घडामोडी पाहूनच मोर्चाचा निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, मला आज कळतंय पोलिस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. पण, मला दुसरीकडून अशी माहिती मिळाली आहे की, दोशींनी अर्जित रजा दिलेली आहे. त्याची मी माहिती घेतो की, ते सक्तीच्या की अर्जित रजेवर गेले आहेत.

दोशी हे जर अर्जित रजेवर असतील तर मीडियासमोर चुकीच्या पद्धतीने येत आहे, असं मला वाटतंय. तुषार दोशींची ज्या ज्या ठिकाणी नियुक्ती झाली, त्या त्या ठिकाणी त्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याऐवजी सरकारच्या बाजूने निर्णय घेतल्याची चर्चा आहे. साताऱ्यात (Satara) ती अपेक्षित नव्हती, पण त्यांनी ती घेतली, अशी टीकाही शिंदे यांनी दोशींवर केली.

ते म्हणाले, सक्तेच्या रजेवर गेल्यामुळे त्यांची चौकशी कोण करणार, त्यांच्यावर कारवाई होणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडियाच्या माध्यमातून कळल्यानंतर ते सक्तीच्या की अर्जित रजेवर गेले आहेत, याचा खुलासा संबंधित विभागाने करण्याची गरज आहे. ते अर्जित रजेवर गेले असतील तर तेही फसविण्याचा प्रकार होईल. सक्तीच्या रजेवर गेले असतील तर त्यांच्यावर कारवाईची भूमिका घेणं गरजेचे आहे.

एसीबीचे अधिकारी देवकर यांनीही बळाचा वापर केला आहे. या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केली किंवा नाही केली तर आम्ही कोर्टात जाऊन सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीला आव्हान देणार आहोत, असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, दोशींवर कारवाईची मागणी आम्ही घटनेच्या दिवशीच केली होती. अधिवेशनाच्या काळातही तशी मागणी आली होती. आता दोशी हे सक्तीच्या किंवा अर्जित रजेवर गेले असले तरी कारवाईला उशीर झाला आहे, हे नक्की आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आम्ही २८ मार्चला काढण्यात येणारा मोर्चा रद्द केला हेाता. दोशी हे सक्तीच्या रजेवर गेल्याने त्या कारवाईला सुरुवात झाली, असं आम्ही मानतो. येत्या ४ एप्रिल रोजी सभापती निवडी आहेत, यावेळी पोलिस, लोकशाहीचा आराखडा पाहून आम्ही मोर्चाचा निर्णय घेऊ. सातारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे, नुसता आवाज दिला तरी हजारो लोक रस्त्यावर उतरले असते, असा दावाही शशिकांत शिंदेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT