Satara SP Tushar Doshi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Update : गोऱ्हेंकडून निलंबनाचे निर्देश...दोन दिवस रजा अन्‌ तिसऱ्या दिवशी कामावर हजर; सातारच्या एसपींच्या पाठीशी कोणती महाशक्ती?

Satara SP News : सातारा झेडपी वादातील एसपी तुषार दोशी पुन्हा रुजू झाल्याने निलंबनाच्या निर्देशांबाबत प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांच्या भूमिकेवरून राजकीय चर्चा पुन्हा रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 26 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत कळीची राहिलेली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदान करु न देता झालेली अटक या वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे दोन दिवसांच्या रजेनंतर आज पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निलंबनाच्या निर्देशाचे काय झाले, अशी चर्चा साताऱ्यात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) सदस्य अनिल देसाई आणि संदीप मोंडवे यांना मतदान करू न देता अटक करून नेत असताना पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस आणि मंत्री देसाई यांच्यात जोरदार झटापट झाली होती. त्या वेळी पोलिसांनी देसाई यांना धक्काबुक्की केली होती, त्यामुळे सातारा प्रकरणाचे तीव्र पडसाद आजही राज्यात उमटत आहेत.

शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत सातारा पोलिस अधीक्षकांची भूमिका आणि पोलिसांच्या झुंडशाहीच्या विरोधात आवाज उठवला होता, त्यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक (Satara SP) तुषार देशी यांना निलंबित करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. मात्र, त्यावरून शह-कटशहाचे राजकारण रंगले होते.

गोऱ्हे यांनी आदेश दिल्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे दोन दिवसांच्या रजेवर गेले होते. मात्र, सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू होत्या. उपसभापती गोऱ्हे यांच्या निर्देशला सभापती राम शिंदे यांनी स्थगिती दिली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी विधानसभेत सातारा प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याची घोषणा केली, त्यानंतर विधान परिषदेत उपसभापतींचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, असे सांगून गोऱ्हे यांच्या निर्देशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

भाजपच्या पातळीवर विशेषतः ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पोलिस अधीक्षक दोशी यांची अप्रत्यक्षपणे जोरदार पाठराखण केल्याचे दिसून आले. त्यांनी विधान परिषदेत उपसभापती गोऱ्हे यांनी दिलेला निर्णय मागे घ्यावा, तुम्ही दोन्ही बाजू ऐकून न घेता, असा निर्णय कसा काय देता, असा सवाल केला होता.

दरम्यान, गेल्या सात दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रागाची तीव्रताही जरा कमी झाली आहे, त्यामुळे मागील दोन दिवसांच्या काळात भाजपकडून दोशी यांची जोरदार पाठराख झाल्याचे दिसून आले. त्या दोन दिवसांच्या काळात अधीक्षक दोशी हे रजेवर गेले होते. वैद्यकीय तपासणीसाठी ते गेले दोन दिवस पुण्याला गेले होते. त्यामुळे गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाचे काय झाले, त्यांच्यावरील कारवाई टळली की काय, अशी चर्चा साताऱ्यात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT