Satara ZP Sabhapati Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Sabhapati : मकरंदआबा, शंभूराज देसाईंची नवी स्ट्रॅटेजी; नितीन पाटलांसह पवारांचा नेता उतरला मैदानात, फुटलेल्या सदस्यांना पुन्हा पक्षात आणणार

Sambhuraj Desai-Makrand Patil News : सातारा झेडपीत भाजपच्या धक्क्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीने नवी रणनीती आखली आहे. फुटलेली मते परत मिळवण्यासाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 27 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मित्रपक्ष भाजपने पोलिस प्रशासनाच्या मदतीने धोबीपछाड दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कमालीचे सावध झाले आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सभापतिपदाच्या निवडीसाठी नवी रणनीती आखली आहे. फुटलेली मते पुन्हा मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.

दरम्यान, हाती बहुमत नसतानाही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत बाजी मारणाऱ्या भाजपनेही (BJP) आता मिशन कमळचा दुसरा टप्पा हाती घेतला आहे. त्यामुळे ४ एप्रिल रोजीच्या सभापती निवडीच्या वेळी पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

सातारा जिल्हा परिषदेच्या (satara Zilla Parishad) निवडणुकीत भाजपला २७ जागा मिळाल्या होत्या, तर एका अपक्ष सदस्याने भाजपला पाठिंबा दिला होता. असे असूनही भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३३ मते मिळविली होती, म्हणजेच भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पाच मते फोडली होती. वास्तविक शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे ३७ मते होती, त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजप नेत्यांचा विश्वास भलताच वाढला आहे. त्यातूनच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे हे चौघेही जिल्हा परिषदेची चारही सभापतिपदे मिळविण्यासाठी सक्रीय झाले आहेत.

भाजपकडून ही सभापतिपदे कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, पाटण आणि खंडाळा या तालुक्यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर तब्बल दीड महिना सदस्यांची खरबदारी घेऊनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पाच सदस्य फुटले होते, त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे सावध झाले आहेत. त्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत झालेल्या पराभवाचा कलंक पुसण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे. खासदार नितीन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे सक्रियपणे त्यांना साथ देत आहेत.

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी मतदान करू न शकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे आता मतदानासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच कामेश कांबळे व लता कर्णे ही फुटलेली दोन मते राष्ट्रवादी पुन्हा आपल्याकडे वळवू शकली तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सभापतिपदाच्या निवडणुकीत यश मिळू शकते.

मकरंद पाटील व्हीप बजावणार

मंत्री मकरंद पाटील हे स्वतःच्या सहीने राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावणार आहेत. व्हीप झुगारल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देत फुटलेल्या सदस्यांना पुन्हा पक्षात आणण्याची खेळी आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार नितीन पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या निवडीसाठी संपूर्ण ताकद लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT