शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात वाढता विरोध
आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघातून मार्ग न नेण्याची मागणी केली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घालत प्रकल्पावरून राजकीय तणाव
kolhapur news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध वाढत आहे. अशातच सातत्याने शक्तीपीठ महामार्गाचे रूपरेषा बदलली जात आहे. नव्या रेषेनुसार हा शक्तीपीठ महामार्ग करवीर विधानसभा मतदारसंघातून जात आहे. त्याला आता शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रदीप नरके यांनी विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातून नेऊ नये अशी मागणी आमदार चंद्रदिप नरके यांनी साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे घातले आहे.
काय म्हटले निवेदनात, प्रस्तावित नवीन नागपूर ते गोवा हा 'शक्तीपीठ महामार्ग' शेतीवर, पर्यावरणावर, महापूर यामुळे शेतकऱ्यांच्या भाविष्यावर प्रश्नाचिन्ह निर्माण करणारआहे. या प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. सदर प्रकल्पामध्ये माझ्या मतदारसंघातील केर्ली, केर्ले, पाडळी बुद्रक, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कोपार्डे कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला या १८ गांवातून पूढे राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुकमधून पुढे घाटातून खाली गोव्याकडे जातो.
माझ्या मतदारसंघामध्ये यापुर्वी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ व कोल्हापूर-वैभववाडी-सिंधुदूर्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी व कोल्हापुर-वैभववाडी हा भव्य रेल्वे मार्ग, असे मार्ग करण्सासाठी अल्प-भू धारक शेतकऱ्यांच्या जमिनी भू संपादीत केल्या आहेत. मतदारसंघात मुळातच शेती क्षेत्र कमी आहे. या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गची भर पडून त्यासाठी जमिनी घेतल्या तर शेतकऱ्याच्याकडे कसायला जमिनी राहणार नाहीत, असा दावा नरके यांनी केला आहे.
शेतजमिनी ओलिताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयाची कर्जे काढून पाईपलाईन टाकून आपली शेती बागायती केलेली आहे. समांतर मार्गांची उपलब्धता असताना सद्यस्थितीत नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध असताना, त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याला जाण्यासाठी सात रस्ते सध्या अस्तिवात असताना पुन्हा समांतर नवीन महामार्गाची गरज नसल्याचे आमचे मत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत या महामार्गाच्या बांधकामामुळे पंचगंगा,कृष्णा, वारणा, कुंभी, कासारी, भोगावती व धामणी नद्यांच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन भविष्यात महापुराचा धोका अधिक तीत्र होण्याची व जमिनी क्षारपड होण्याची भीती आहे.
तरी माझे मतदारसंघातील शेतकरी या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी ग्रामसभांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे ठराव संमत केले आहेत. जनभावना आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघाऐवजी अन्यत्र वळविणेबाबत फेरविचार करणेत यावा अशी मागणी केली आहे.
1. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प काय आहे
हा राज्य सरकारचा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे
2. या प्रकल्पाला विरोध का होत आहे
स्थानिक भागातून जाणाऱ्या मार्गामुळे नागरिक आणि नेत्यांचा विरोध आहे
3. कोणत्या आमदाराने विरोध केला आहे
चंद्रदीप नरके यांनी विरोध दर्शवला आहे
4. त्यांनी कोणाकडे मागणी केली आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मार्ग बदलण्याची मागणी केली आहे
5. या वादाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो
राजकीय तणाव वाढण्याची आणि प्रकल्पात बदल होण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.