Shambhavi Kalyanshetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP : आमदार पत्नीचा झेडपी अध्यक्षपदास नकार : पालकमंत्री गोरे कोणाला संधी देणार?, 'हे' तालुके सर्वाधिक आघाडीवर

Zilla Parishad President Issue : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची शर्यत रंगली आहे. शांभवी कल्याणशेट्टी यांनी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्याने बार्शी, माढा, मोहोळ तालुक्यातील सदस्यांची नावे चर्चेत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 February : सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच बहुमत मिळाले आहे, त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चर्चेत आघाडीवर असलेल्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी ‘आपली जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची इच्छा नाही,’ असे स्पष्ट केल्याने आता या पदावर कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, शांभवी कल्याणशेट्टी यांनी नकार दिल्यामुळे अध्यक्षपदासाठी आता बार्शी, माढा, मोहोळ तालुक्यातील सदस्यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, कोणत्या सदस्याला लॉटरी लागते. येथील नेतेमंडळी कोणाच्या पाठीशी आपली ताकद लावतात आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore)कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zilla Parishad) ६८ जागांपैकी तब्बल ३८ जागा भारतीय जनता पक्षाने प्रथमच जिंकल्या आहेत. आतापर्यंत कमळाच्या चिन्हावर निवडून आलेला सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकलेला नाही, त्यामुळे भाजपला इतिहासात पहिल्यांदा आपला अध्यक्ष बसविण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे भाजपचा जिल्हा परिषदेचा पहिला अध्यक्ष कोण होणार, याची मोठी उत्सुकता जिल्ह्यात आहे.

भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या ३८ जागांपैकी १५ ओबीसी सदस्य आहेत, त्यामुळे भाजपकडून मूळ ओबीसी अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. अध्यक्षपदासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या समर्थक भारती दराडे आणि दीपक वैद्य, माढ्याचे शिंदे गटाचे समर्थक शिवाजी कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामप्पा चिवडशेट्टी, मोहोळ तालुक्यातील विमल खताळ यांची नावे आघाडीवर आहेत.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नऊपैकी सात, तर पंचायत समितीच्या १८ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. तत्पूर्वी अक्कलकोट आणि मैंदर्गी नगरपरिषदाही जिंकल्या आहेत, त्यामुळे कल्याणशेट्टी यांचे पारडे निश्चितपणे जड आहे. मात्र, आमदार कल्याणशेट्टींच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद होण्यास नकार दिला आहे.

मी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत निवडून आले आहे. पूर्ण कामाचा अनुभव घेतल्याशिवाय मोठ्या पदावर जाण्याची माझी इच्छा नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाला न्याय देता आला पाहिजे. आमदार पत्नी म्हणून मला अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे, त्यामुळे मला आता जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT