

Karad, 20 February : सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप नेते तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दावा केला आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेचे बलाबल जास्त आहे. भाजपला सत्तास्थापन करायची झाल्यास अजूनही सहा सदस्यांची गरज आहे. भाजपचे नेते राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेनेचे काही सदस्य अनुपस्थित ठेवू शकतील, याचा अंदाज आल्याने राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना नेत्यांनीही त्यांचे पक्षाचे सदस्य सुरक्षितस्थळी हलवले आहेत. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांनी जिल्ह्यातील कॉँग्रेस, अपक्ष सदस्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. तसा संपर्क त्यांनी सुरू केला आहे. भाजपपुढे सत्ता स्थापनेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुमताचा आकडा भाजप गाठणार कसा? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात महायुती कुठेच दिसून आली नाही. तत्पूर्वी सातारा (Satara)जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीतील पक्षांची बैठक बोलावली. मात्र, त्याला भाजपचे नेते आले नाहीत. हा अवमान मोठ्या मनाने गिळल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचेच स्पष्ट केले.
जिल्ह्यात भाजपविरोधात (BJP) शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस अशी लढत झाली. भाजपच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाला बहुमत मिळेल, या आशेने निवडणुकीत सवता सुभा मांडून निवडणुका लढवल्या. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांना सहकार्याची भूमिका घेत निवडणुकीला सामोरे गेले.
भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात सभा घेतल्या. त्यातून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना डिवचण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांचे संबंध ताणले गेल्याने वातावरण चिघळले. प्रचारातील टीकेला पालकमंत्री देसाई, मंत्री पाटील यांनी त्या-त्या वेळी उत्तर दिले. मात्र, मतदारांनीही निकालातून कोणालाच स्पष्ट कौल दिला नाही.
जिल्हा परिषदेच्या ६५ पैकी भाजपला २७, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, शिवसेनेला १५, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक आणि भाजप बंडखोर एक अपक्ष जागावर विजयी झाले. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा स्वतंत्ररीत्या दावा करता न येणारा कौल मतदारांनी दिल्याने आता भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापन करता येईल की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, अशी घोषणा भाजपचे मंत्री गोरे यांनी केली आहे. त्यासाठी भाजपने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी ३३ सदस्यांची गरज आहे. तो आकडा गाठण्यासाठी भाजपला सहा सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या वेताळ कोपर्डे हवेली गटातून अपक्ष म्हणून जिंकून आल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही एक सदस्य निवडून आला आहे. उर्वरित सदस्य शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयातील सत्तेसाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे.
भाजपचे नेते राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेनेचे काही सदस्य अनुपस्थित ठेवू शकतील, याचा अंदाज आल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने पहिल्यांदाच त्यांचे सदस्य सुरक्षितस्थळी हलवले. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांचे सदस्य सुरक्षितस्थळी पाठवले आहेत. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांनी आता जिल्ह्यातील कॉँग्रेस, अपक्ष उमेदवारांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपसाठी सत्ता स्थापनेचा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला असून, बहुमताचा आकडा भाजप कसा गाठणार? याचीच उत्सुकता सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पडद्यामागील हालचालींना वेग
सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला आवश्यक ३३ चे संख्याबळ गाठण्यासाठी अजून सहा सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीचे २० आणि शिवसेनेचे १५ सदस्य असल्याने दोन्ही पक्षांचे बलाबल भाजपपेक्षा जास्त आहे. सत्ता समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काही सदस्य अनुपस्थित ठेवण्याच्या हालचाली होऊ शकतात. या शक्यतेने राष्ट्रवादीचे सदस्य सुरक्षितस्थळी हलवले आहेत. त्यानंतर शिवसेनेनेही तीच पावले उचलली. दरम्यान, बहुमतासाठी भाजपकडून अपक्ष व इतर पक्षांच्या सदस्यांशी संपर्क वाढवण्यात येत असून, जिल्हा परिषद सत्तेसाठी पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सत्तेचा दावा कोणत्या आधारे?
भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट अध्यक्षपदावर दावा केला आहे. जागा कमी आल्या; म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सोडणार नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, अध्यक्ष भाजपचाच व्हावा, यासाठी वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, आपण आपल्या पद्धतीने काम करू, असे गोरे यांनी म्हटले आहे.
भाजपचे सत्तेसाठीचे संख्याबळ सहाने कमी आहे, तरीही मंत्री गोरे यांनी सत्तेचा दावा कोणत्या आधारावर केला आहे, याबाबत राजकीय वर्तुळात खल सुरू आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपची खेळी काय असणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेही सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.