Eknath Shinde | Mahesh Shinde| Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politics : शंभूराज देसाईंनी कोरेगावात घातले लक्ष : महेश शिंदेंच्या करेक्ट कार्यक्रमाचे संकेत; एकनाथ शिंदेंचाही बर्गेंना मोलाचा सल्ला

Mahesh Shinde vs Shambhuraj Desai conflict: सातारा झेडपी वादानंतर शंभूराज देसाई यांनी कोरेगावात लक्ष केंद्रित करत महेश शिंदेंच्या पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे संकेत देत जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरण दिसत आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 14 April : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुमत मिळवूनही भाजपने केलेल्या तोडफोडीच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविता आली नाही. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेली धक्काबुक्की यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई हे कमालीचे दुखावले आहेत.

या सर्व प्रकरणात कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची भूमिकाही कळीची राहिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी कोरेगावमध्ये लक्ष घातले असून आमदार शिंदेंच्या पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे घडामोडींवरून दिसून येत आहे. तसेच संकेतही शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपने कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्यावर फासे फेकले. शिंदे यांची पत्नी प्रिया शिंदे यांना ऐनवेळी भाजपने अध्यक्षपदाची उमेदवारी दिली, त्यामुळे आपसूकच आमदार शिंदे यांच्या गटाचे कोरेगावमधून निवडून आलेल्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता सातारा जिल्हा परिषदेत आणण्यासाठी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि मकरंद पाटील हे जंगजंग पछाडत असताना शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी भाजपच्या बाजूने जात त्याला खो देण्याचे काम केले. विशेष म्हणजे भाजपसोबत जाण्याचे त्यांनी समर्थनही केले आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड सध्या न्यायालयीन कचट्यात अडकली आहे. मात्र, महेश शिंदे यांची ही खेळी शंभूराज देसाई यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येते.

शंभूराज देसाई यांनी जाहीरपणे त्याबाबत भाष्य केले नसले तरी आपत्रतेच्या माध्यमातून त्यांंनी आमदार शिंदे यांचे पंख छाटण्याचे काम सुरू केले आहे. एवढे दिवस एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष न घालणारे देसाई यांनी आता कोरेगावात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे मागील काही दिवसांच्या घडामोडीवरून दिसून येत आहे. त्यांनी कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघाचा बारकाईने आढावाही घेतला आहे.

कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री देसाई यांची सातारा येथे भेट घेतली. त्यावेळी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. कऱ्हाड पॅटर्नप्रमाणेच कोरेगावात नगरपंचायतीची निवडणूक लढविण्याचा सल्लाही देसाई यांनी बर्गे यांना दिला.

कोरेगाव आणि कोरेगावमधील बर्गे घराण्याशी आमचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे. राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून तो ऋणानुबंध आगमी काळात जपण्यात येईल. कोरेगावातील विकासकामांना गती देण्यासठी हा ऋणानुबंध उपयोगी येईल, हे सांगताना निष्ठावंत आणि खऱ्या शिवसैनिकांना आगामी काळात ताकद देण्याचे काम केले जाईल, असे सांगून नगरपंचायतीच्या निमित्ताने शिवसेनेतील बर्गे गटाला ताकद देण्याचे काम देसाई यांनी सुरू केल्याचे दिसून येते. म्हणजेच महेश शिंदेंसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

दरम्यान, राजाभाऊ बर्गे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही दरे गावी जाऊन भेट घेतली आहे. कोरेगावने शिवसेनेला कायम साथ दिली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकळ करण्याचा कानमंत्र खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बर्गे यांना दिल्याने त्यांना कामाला लागण्याची सूचना दिल्याचे मानले जात आहे, त्यामुळे आमदार महेश शिंदे यांना कोरेगावात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न शिवसेनेतून होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT