Kolhapur Politics : इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार का? तर राजू शेट्टींचे जमत नसल्याने हातकणंगलेत राष्ट्रवादी स्वाभिमानीच्या विरोधात उतरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांत अजूनही उमेदवारांची शोधाशोध सुरु आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीच्या निष्ठावंत नेत्यांचा कस लागणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (१८ ऑक्टोबर) कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाबाबत आढावा बैठक पार पडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीची उतरती कळा लागली आहे. शरद पवारांकडे कोल्हापूरसाठी आश्वासक चेहराही राहिला नाही. जिल्ह्यातील दोन आमदार अजित पवारांसोबत गेल्याने राष्ट्रवादीला महापालिकेत उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली.
हातकणंगले मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत राहण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाकडे लोकसभेसाठी सक्षम चेहरा नसल्याने इंडिया आघाडीमधून शेट्टी यांनाच पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यात माजी मंत्री आमदार जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक हे विधानसभेचे सदस्य आहेत. तर दुसरीकडे शेट्टी यांची इंडिया आघाडीत जाण्याची भूमिका अजूनही तळ्यात मळ्यात आहे. राष्ट्रवादी या ठिकाणी दावा करून माजी मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागू शकतात. प्रसंगी शेट्टी यांच्याविरोधात राष्ट्रवादी उतरणार असल्याचे बोलले आहे.
गेल्या दोन महिन्याआधी निष्ठावंतांचा मेळावा पार पडला असला तरी, शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. पण जिल्ह्यातून त्यांना प्रतिसाद मिळेल याची शक्यता कमीच आहे.
कोल्हापूर आणि हातकलंगले मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद मजबूत आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र आल्यास महायुतीला त्याचा फटका बसू शकतो. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास काँग्रेसचे माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील (विधानपरिषद) आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री पाटील, आमदार जयंत पाटील आसगांवकर (विधानपरिषद) असे संख्याबळ आहे.
राष्ट्रवादीचा निष्ठावंत आणि ठाकरे गटाचा कडवा शिवसैनिक महाविकास आघाडीच्या बाजूने ठामपणे उभा राहील. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळता हातकणंगले, शिराळा, इस्लामपूर मधून महाविकास आघाडीची फळी मजबूत आहे. पण सध्या तरी महाविकास आघाडीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे दोन नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत कस लागणार हे नक्की आहे.
मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्यांचे मेरिट जिल्ह्यात जास्त त्या पक्षाला लोकसभेची उमेदवारी असे विधान केले होते. जर यानुसार लोकसभा उमेदवारांची निवड झाली तर कोल्हापूर हा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. प्रत्यक्ष चर्चेनंतरच यातून मार्ग निघेल.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.