आपल्याला कुणी स्पर्धक तयार होतोय, याची चाहूल लागली की त्याला संपवण्यासाठी राजकीय नेते शक्य असलेल्या सर्व मार्गांचा अवलंब करतात. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, भाजपचे नेते कै. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याबाबतीत असेच घडत आहे.
पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडल्याशिवाय अंतर्गत विरोधक शांत बसणार नाहीत, असे चित्र दिसत आहे. पंकजा यांची कोंडी करण्याची एकही संधी पक्षांतर्गत विरोधकांकडून सोडली जात नाही. जीएसटी थकवल्याच्या कारणावरून पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता एफआरपीसाठी साखर आयुक्तालयाने या कारखान्याकडून महसुली वसुली करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्या यात्रेमुळे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला वलय मिळाले. निवडणुकीत युतीचा विजय झाला. पंकजा कॅबिनेट मंत्री बनल्या. मुख्यमंत्री बनण्याची त्यांची अभिलाषा लपून राहिली नाही. त्यात काही वावगेही नव्हते. महत्त्वाकांक्षा प्रत्येक राजकीय नेत्याला असते. तशी ती पंकजा यांनाही असावी. त्यांचा तर वारसाही मोठा होता. राज्यात भाजपला बहुजन समाजात रुजवण्यात पंकजांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. मराठवाड्यातही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच भाजपने हातपाय पसरले. राज्यातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचलेले शरद पवार यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे हे एकमेव नेते. असे असले तरी हयात असताना त्यांनाही पक्षाकडून दुजाभावाची वागणूक मिळाली.
गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे, याचा अंदाज येताच पक्षाने त्यांना केंद्रात पाठवले. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी आपली पकड, महत्त्व कायम ठेवले होते. वडिलांत असलेल्या या गुणांचा पंकजा यांच्यात अभाव जाणवतो. त्याला त्यांचे फटकळ बोलणे कारणीभूत ठरते आहे, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे त्या मागे एकदा म्हणाल्या होत्या. त्यानंतर तर त्यांना गटबाजीचा जास्तच फटका बसला आहे. अशातच २०१९ च्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला, मग तर पक्षांतर्गत विरोधकांना आयतेच हत्यार मिळाले. एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले, मंत्रिपदे देण्यात आली. मात्र, पंकजा यांचे पुनर्वसन करण्याचा विचार भाजपने केलाच नाही.
जीएसटी थकवल्याच्या कारणावरून वैद्यनाथ कारखान्याला नोटीस बजावल्यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते. ही रक्कम भरण्यासाठी समर्थकांनी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता एफआरपी थकवली म्हणून वैद्यनाथ कारखान्यावर कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. अर्थात, अशी कारवाई फक्त पंकजा यांच्या कारखान्यावरच झालेली नाही. राज्यातील १५ जिल्ह्यांतील सहकारी व खासगी अशा एकूण ३१ कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावयाची एफआरपीची रक्कम थकवली आहे. या सर्व कारखान्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. याद्वारे भाजपने पंकजा यांची कोंडी करण्यासाठी आणखी एक कारण शोधले आहे. पंकजा यांनी नुकतीच शिवशक्ती परिक्रमा काढली होती. या परिक्रमेला मोठा प्रतिसाद मिळाला. तेही पक्षाच्या पचनी पडले नव्हते.
मी परळी मतदारसंघ सोडणार नाही, असे पंकजा यांनी नुकतेच म्हटले आहे. पक्षात त्यांच्याबाबतीत काय घडत आहे, याचा अंदाज त्यातून येतो. पंकजा यांना पराभूत केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आता भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघावर नैसर्गिक दावा आहे. पंकजा यांना पक्षातून बेदखल करण्यासाठी हे आणखी एक मोठे हत्यार भाजपला मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची घट्ट मैत्री लपून राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. जाणकारांना आणखी उघड करून सांगण्याची गरज नसावी.
अशा पद्धतीने पक्षांतर्गत विरोधकांनी पंकजा मुंडे यांना चहुबाजूंनी घेरले आहे. पक्षाने सतरंजी ओढून घेतली आहे, पंकजांना बसण्यासाठी आता जागाच नाही. त्या भाजपमधून बाहेर पडल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत, असे चित्र दिसत आहे. सध्या पंकजा यांच्यासमोर योग्य पर्यायही उपलब्ध नाही. त्यांच्या मतदारसंघाच काँग्रेस कमकुवत आहे. राष्ट्रवादीची दोन शकले झाली असून, एक गट भाजपसोबत सत्तेत आहे. तशीही पंकजा यांची राष्ट्रवादीशी ट्यूनिंग फारशी जमत नाही. शिवसेनेचीही दोन शकले झाली आहेत. मध्यंतरी पंकजा म्हणाल्या होत्या की मी लोकसभा लढवणार नाही. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार आहेत. प्रीतमची जागा मी हिरावून घेणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. याचा अर्थ असा की पक्ष त्यांना लोकसभा लढवायला सांगत आहे. त्यांची एवढी कोंडी केली जात असताना पक्ष प्रीतम यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देईल का, याबाबतही शंकाच आहे. पंकजा यांना ओबीसींचा मोठा जनाधार आहे. त्यांनी पक्ष सोडला तर तो त्यांच्या पाठीमागे राहणार नाही, असे भाजपला वाटत असावे. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी पक्षांतून बाहेर पडावे, अशा चाली पक्षांतर्गत विरोधकांकडून खेळल्या जात आहेत. संघर्षाचा वारसा असलेली कै. गोपीनाथ मुंडे यांची ही कन्या ही संकटे कशी भेदणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.