Raj Thackeray-Sharad Pawar
Raj Thackeray-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवार म्हणतात; राज ठाकरे एका व्याख्यानानंतर चार महिने भूमिगत होणारे नेते

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : राज ठाकरे यांचे वैशिष्ट्य आहे की, ते तीन-चार महिने कुठेतरी भूमिगत होतात नंतर एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढील तीन चार महिने काय करतात माहीत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भाष्य केले. त्यावर पवार यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘ राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, ‘‘ ते काहीही बोलू शकतात त्यांच्या तोंडावर कोणीही मर्यादा घालू शकत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेतृत्त्वात पहिले नेते हे छगन भुजबळ ओबीसी समाजाचे होते. त्यानंतर मधुकराव पिचड आदिवासी समाजाचे होते. अशी संपूर्ण यादी पाहीली तर यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आहे. विविध जातीजमातीच्या लोकांना घेऊन जाण्याचा दृष्टीकोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि पुढेही राहील.’’

पवार म्हणाले, ‘‘ उत्तर प्रदेशात योगींच्या काळात शेतकऱ्यांवर गाडी घालण्यात आली. त्यात अनेक शेतकरी दगावले. योगींच्या पाच वर्षांच्या राजवटीत जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केली केली. लखीमपूर घटना असो वा हाथरसची घटना, योगींच्या राजवटीत काय झाले, हे देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात अशा घटना पाहायला मिळणार नाहीत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.’’

उत्तर प्रदेश विधानसभेचा निकाल लागला, तो निकाल भाजपच्या बाजूने का लागला, त्याची अनेक कारणे सांगता येतील, पण राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात विकास कुठे दिसला, असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिका आणि अन्य निवडणुकांमध्ये मागील काळातील राज ठाकरेंच्या पक्षाची आकडेवारी पाहीली तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके अत्यंत मर्यादित आकडे आहेत. यातूनच त्यांना मिळालेला जनतेचा पाठिंबा दर्शवतो असे खोचक टिप्पणी पवार यांनी केली.

‘यूपीए’चे अध्यक्षपद स्वीकारण्यात मला रस नाही. मात्र, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून केले जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे त्या पक्षाने या कामासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देशपातळीवर होणाऱ्या बदलांवर भूमिका मांडताना पवार यांनी देशातील मुख्य प्रश्नांकडे लक्ष वेधले. यामध्ये महागाई हा गंभीर विषय आहे. याआधीही इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत परंतु रोज किंमती वाढलेल्या पाहण्यात आलेल्या नाहीत. पण भाजपाचे राज्य आल्यांनतर या किंमती रोज वाढत असल्याची टीका पवार यांनी केली. यातून जो माणूस मोटारीने प्रवास करतो केवळ त्यालाच नव्हे तर प्रत्येकाला महागाईचा फटका बसत आहे. गोष्टीची सर्वाधिक किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, ‘‘ सामाजिक ऐक्य संकटात येईल अशी वक्तव्य करण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली आहे. देश पुढे जाण्यासाठी संपूर्ण समाज हा एकसंघ ठेवायला हवा. माणसा माणसात, जाती जातीमध्ये मतभेद नसून एक वाक्यता असली पाहीजे. आपण भारतीय आहोत ही भावना रुजली पाहीजे. पण अशी भावना रुजवण्याऐवजी तू एका धर्माचा तू दुसऱ्या धर्माचा असे जाणीवपूर्वक वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय ते देशाच्या दृष्टीने घातक आहे.’’

पवार म्हणाले, ‘‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी पवार यांनी आपला दृष्टीकोन मांडला. ते म्हणाले, ‘‘ या चित्रपटाच्या माध्यमातून जनमानसात विषारी भावना कशी वाढेल हीच केंद्रीय सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे.काश्मीर फाइल्स ही फिल्म पाहिल्यानंतर अन्य धर्मीयांच्या माणसाला संताप येईल. तो संताप येऊन शेवटी काही लोकांनी कायदा हातात घ्यावा, असे चित्र यामध्ये दिसत आहे.काश्मीरमधील हिंदू लोक त्यातही मुख्यत्वे पंडित ज्यावेळी बाहेर पडले तेव्हा काँग्रेस राज्यकर्ते होते हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंह हे देशाचे प्रधानमंत्री होते. त्यांच्या सरकारला भाजपाचा पाठिंबा होता. त्यांच्या काळात मुफ्ति मोहम्मद सईद हे भाजपच्या पाठिंब्याने गृहमंत्री होते. फारुख़ अब्दुल्ला हे राज्यात सत्तेवर नव्हते. त्याठिकाणी ज्यांना राज्यपाल म्हणून नेमले त्या व्यक्तीचे धोरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने चांगले नाही म्हणून त्यांचा नेमणुकीचा विषय आला तेव्हा फारुख अब्दुला यांनी राजीनामा दिला. हे नवीन राज्यपाल नेमल्यानंतर त्यांच्या राजवटीत जे हल्ले झाले ते काश्मीरमधील जो एक वर्ग पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतो त्यांच्याकडून झाले. जे मुस्लीम पाकिस्तानसोबत जायचे नाही या भूमिकेचे होते त्यांच्यावरही आणि हिंदूंवरही हल्ले झाले होते.’’

या हल्ल्यांतून सगळ्या घटकांना संरक्षण देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची होती. जे भाजपमध्ये होते. पण त्यांनी हे केले नाही. त्यांनी तिथल्या हिंदूंना भ्रमित करून तिथून जाण्याचा सल्ला त्याकाळच्या राज्यकर्त्यांना दिला. त्यांना साधने पुरवून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित केले, असा इतिहास असताना अशा प्रकारची फिल्म मांडणे जी सत्यावर आधारीत नाही, ती जातीयवाद वाढवणारी, द्वेष वाढवणारी आहे. अशी फिल्म निघाल्यानंतर ती पाहिलीच पाहीजे, असे देशाचे प्रमुख बोलायला लागले आणि सत्ताधारी पक्ष लोकांना तिकीटं देऊन फिल्म मोफत दाखवायला लागले तर याचा अर्थ सांप्रदायिक विषारी प्रचार वाढवून माणसांमध्ये विभाजन करून राजकीय फायदा घ्यायचा. त्यांचा कामावर आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यावर विश्वास नाही तर जनमानसात विषारी भावना कशी वाढेल याकडेच त्यांचे लक्ष आहे, हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही, असे मत पवार यांनी मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT