RAY Nagar, solapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar On Ray Nagar : 'रे नगर'चे खरे श्रेय कोणाला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

Solapur Political News : 'सरकार त्यांचेच श्रेय तर घेणारच...!'

Anand Surwase

Solapur News : सोलापुरात जगातील सर्वात मोठा असंघटित कामगारासाठींचा रे नगर हा गृहप्रकल्प साकारला आहे. 30 हजार घरांच्या या प्रकल्पातील 15 हजारांचा घरांचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. डाव्या विचारसरणीचे माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या दुरदृष्टीतून या रे नगरची संकल्पना पुढे आली.तर काँग्रेसच्या काळात सुरू झालेली ही योजना भाजपच्या काळात कार्यान्वित झाली आणि पूर्णत्वासही गेली.

तत्पूर्वी या प्रकल्पाची मूहर्तमेढ रोवण्यासाठी शरद पवार यांनी देखील मोलाचे सहकार्य केले होते.दरम्यान, या प्रकल्पाच्या श्रेयवादावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना रे नगरचे संपूर्ण श्रेय हे आडम मास्तर यांनाच जात असल्याचे मत व्य्क्त करत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

सरकार त्यांचेच श्रेय तर घेणारच...!

रे नगर या कामगार वसाहतीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपकडून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र कॉम्रेड आडम मास्तर (Narsaiya Adam) यांनी 13 वर्षाचा संघर्ष करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला, असे असताना भाजपकडून या रे नगरच्या प्रकल्पाच्या हस्तांतरण कार्यक्रमासाठी मोठी जाहिराबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला.

निश्चितच हा प्रकल्प भाजपच्या काळात पूर्णत्वास गेला, हे जरी सत्य असले तरी यासाठी आडम मास्तरांनी केलेला संघर्षही तितकाच मोठा आहे. असे असतानाही आडम मास्तर यांनी आमचे विचार टोकाचे आहेत. आम्ही आमचे प्रयत्न करून हा प्रकल्प मार्गी लावला यासाठी सर्वाचे सहाकार्य लाभले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभल्याचे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले होते. तसेच भाजपचे सरकार सत्तेत आहे आणि ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारच आहेत. मात्र, आम्ही केलेला संघर्ष आम्हाला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया आडम यांनी दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्व श्रेय आडम मास्तरांचेच...

दरम्यान, दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना या संदर्भात विचारणा केली असता, पवार म्हणाले की, रे नगरचे (R Nagar) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले असले तरी या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय माजी आमदार नेते आडम मास्तर यांना जाते. ते आजच नाही. तर अनेक वर्षापासून आडम मास्तरांचा हा कार्यक्रम चालू आहे. त्यांनी आजपर्यंत पहिला, दुसरा आणि आता तिसऱ्या टप्प्यात असंघटित कामगारांना घरे मिळवून दिली आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून बिडी कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी ते गेली अनेकवर्ष सातत्याने प्रयत्न करत होते. त्यामुळे मोदींनी उद्घाटन केलेला हा रे नगर प्रकल्प आडम मास्तर यांच्या मेहनतीचा प्रकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'मोदींनी हे काही चांगलं केलं नाही...'

राजकारणात प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असते, परंतु असे असले तरी विधायक कामे ही वेगळी असतात. त्यामुळे विधायक कामांचे कौतूक करत पंतप्रधान चार शब्द चांगले बोलले असते, त्यांना प्रोत्साहित केले असते तर शोभून दिसले असते. मात्र ते डाव्या विचारसरणीचे उजव्या विचारसणीचे आहेत म्हणून त्यांना प्रोत्साहित न करण्याची भूमिका ठेवणे ही काही चांगली गोष्ट झाली नसल्याचे सांगत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर निशाणा साधला.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ही घरे ज्यांना मिळाली आहेत आणि ज्यांच्यामुळे मिळाली आहेत,त्याच्याबाबतीत विचार करायला हवे होते.याशिवाय तरुणांसमोर उभे असलेले बेरोजगारीचे प्रश्न,महागाई याचा पंतप्रधान मोदींनी ओझरता उल्लेख केला असता तरी चांगले वाटले असते,असा टोलाही पवार यांनी मोदींना लगावला.

शरद पवारांनी केले होते सहकार्य...

असंघटित कामगारांसाठी साकारण्यात आलेला या 30,000 घरांच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाला सुरुवातील 2013 मध्ये काँग्रेस सरकारने मंजुरी दिली होती. यावेळी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री अजय माकन यांनी 4,500 घरांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली होती.त्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक घऱाला 2.5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

त्याचवेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात होते.त्यावेळी शरद पवार यांनी या प्रकल्पासाठी काँग्रेसचा विरोध असतानाही राज्य सरकारकडून 1.5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT