Adam Mastar : 'रे नगर'साठी आडम मास्तरांचा संघर्ष, नवोदितांसाठी एक 'केस स्टडी'च!

Ray Nagar News : आडम मास्तर म्हणतात, सुशीलकुमार शिंदेंकडून सहकार्य नाही, तर शरद पवार, देवेंद्र फडणवीसांकडून पाठबळ
Adam Mastar -Sushilkumar Shinde - Devendra Fadnavis
Adam Mastar -Sushilkumar Shinde - Devendra Fadnavis Sarkarnama

Solapur News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि भाजपची विचारधारा म्हणजे दोन ध्रुवांची दोन टोके. हो दोन पक्ष एकत्र आले, असे सहसा कधी होत नाही. काँग्रेस आणि माकपबाबत असे म्हणता येत नाही. असे असतानाही सोलापुरातील असंघटित कामगारांच्या जगातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाला काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिदे यांनी सहकार्य केले नाही, असा आरोप या प्रकल्पाचे प्रवर्तक, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर करतात.

भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सर्व प्रकारचे सहकार्य केले, आपल्या संघर्षाला पाठबळ दिले, असे ते सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या प्रकल्पाला मंजुरी मिळवून दिली.

हे असे का झाले असावे? यालाच राजकारण म्हणतात का?

आडम मास्तर( Adam Mastar) म्हणतात, तसे या गृहप्रकल्पाला शिंदे यांच्याकडून सहकार्य का मिळाले नसेल आणि टोकाची विरोधी विचारधारा असलेल्या पक्षाच्या (भाजप) तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून (देवेंद्र फडणवीस) पाठबळ का मिळाले असेल? असे उदाहरण फारसे पाहायला मिळत नाही. राजकारणात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि नवोदित राजकीय नेत्यांसाठी ही एक छान, उपयुक्त अशी 'केस स्टडी' ठरू शकते.

नवोदित राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाचा पूर्ण प्रवास समजून घेतलाच पाहिजे. दूरदृष्टीने विचार नाही केल्यास राजकीय जीवनात मोठे नुकसान होऊ शकते, एका उपयुक्त कामाला हातभार लावण्याची संधी हातची जाऊ शकते. सुशीलकुमार शिंदेंच्या बाबतीत हेच झाले, असे म्हणता येईल. त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टी दाखवत स्वतःचे आणि आपल्या पक्षाचे नाव या प्रकल्पासोबत कायमचे जोडून घेतले.

Adam Mastar -Sushilkumar Shinde - Devendra Fadnavis
Adam Mastar : रे-नगरमुळे माझं डिपॉझिट जप्त झालं होतं : आडममास्तरांनी सांगितली 'ती' आठवण!

आता शिंदे यांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला आहे का? त्यासाठीही त्यांनी भाजपच्या खांद्यावरच बंदूक ठेवली आहे. मला आणि कन्या प्रणितीला भाजप प्रवेशाची ऑफर होती, मात्र ती आम्ही नाकारली, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी अचूक वेळेची निवड केली आहे. आता या गृहप्रकल्पाचे लोकार्पण होत आहे.

त्यावरून होऊ शकणाऱ्या 'डॅमेज'वरून लक्ष वळवण्यासाठी शिंदे यांनी या गौप्यस्फोटाचे टायमिंग साधले असावे. शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शिंदे यांचा गेल्या दोन निवडणुकांत पराभव झाला आहे. त्याची परतफेड करण्याची संधी आता प्रणिती यांना मिळणार आहे.

हे सर्व घडत असताना मधेच 'रे नगर गृहप्रकल्पा'चा लोकार्पण सोहळा आला आहे. आडम मास्तर यांची कल्पना आणि प्रयत्नांतून हा प्रकल्प मार्गी लागला आहे. असंघटित कामगारांसाठी या प्रकल्पात 30,000 हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी 15,000 घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (19 जानेवारी 2024) करण्यात येणार आहे. देशातीलच नव्हे, तर जगातील हा अशा प्रकरचा एकमेव प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. आडम मास्तर हे कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहेत.

केंद्रीय गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आडम मास्तर यांनी यापूर्वीही केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला, असेही आडम मास्तर यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दोन्ही निवडणुकांत भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. दोन्ही खासदारांकडून भरीव असे काम झाले नाही. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर लोकांची नाराजी आहे. त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत. त्यांच्या जातप्रमाणपत्राचे प्रकरणही न्यायप्रवीष्ट आहे. अशा परिस्थितीत प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांची बाजू नक्कीच भक्कम असेल. मात्र, मध्येच आता रे नगरचे प्रकरण आले आहे. लोकार्पणाच्या निमित्ताने या प्रकल्पाच्या उभारणीच्या इतिहासाची उजळणी होत आहे. तसेच आडम मास्तरांच्या आरोपानुसार सुशीलकुमार शिंदे यांनी कथितपणे न दिलेल्या योगदानाची चर्चा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी या दृष्टीने निशाणा साधू शकतात. पर्यायाने शिंदे यांची पीछेहाट होऊ शकते.

इतिहास असा आहे, की शदर पवार यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने 31 मे 2013 रोजी या प्रकल्पाला (पथदर्शी प्रकल्प) मंजुरी दिली. दोनशे एकर जागा खरेदी करण्यासाठी प्रतिसभासद सहा हजार रुपये जमा करण्यात आले. वर्षभरानंतर म्हणजे 2014 ला विधानसभेची निवडणूक होणार होती. आडम मास्तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे माजी आमदार आहे.

प्रणिती शिंदे आता या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. हा प्रकल्प आकाराला आला तर आडम मास्तरांचा पुन्हा जम बसेल, अशी भीती शिंदे यांना असावी. त्यामुळे प्रणिती यांनी त्यावेळी या प्रकल्पाला विरोध सुरू केला. राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारने हा प्रकल्प रखडवत ठेवला, असाही आरोप आडम मास्तर सतत करतात.

Adam Mastar -Sushilkumar Shinde - Devendra Fadnavis
Amol Mitkari : सहाच महिन्यांत अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

रे नगर गृहप्रकल्प पूर्णत्वाला जाणार नाही, असा प्रचार 2014 च्या निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आला. सोलापुरातल्या कापड गिरण्या आडम मास्तर यांनीच बंद पाड़ल्या असा ढोबळ आऱोप सोलापुरातील काही लोकांकडून केला जातो. कामगार संघटनांचा संदर्भ याच्याशी जोडला जातो. आता पुन्हा तसाच प्रोपगंडा सुरू करण्यात आला होता. दोनशे एकर जमिनीसाठी कामगारांकडून गोळा करण्यात आली होती. त्यात आडम मास्तर यांनी 25 ते 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जाऊ लागला. जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात आली.

पुढे प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आडम मास्तरांविरुद्ध मोर्चा काढला. कामगारांकडून गोळा केलेले पैसे परत करावेत, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. 2014 च्या निवडणुकीत आडम मास्तर यांचे डिपॉझिट जप्त झाले. प्रणिती शिंदे विजयी झाल्या. विशेष असे की, आडम मास्तर यांनी कामगारांसाठी गोदुताई परुळेकर नगरमध्ये 10,000 घरांची उभारणी केली होती. तरीही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

हे असते राजकारण. एक दूरदृष्टी नसलेले आणि दुसरे दूरदृष्टी असलेले. येथे देवेंद्र फडणवीस यांना गमावण्यासारखे काहीच नव्हते. झाला तर फायदाच होणार होता. त्यांनी दूरदृष्टीने विचार केला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आडम मास्तर यांच्या संघर्षाला त्यांनी पाठबळ दिले. 2019 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या गृहप्रकल्पाची पायाभरणी झाली. घरांच्या चाव्या द्यायलाही मीच येणार, असे त्यावेळी मोदी यांनी जाहीर केले होते. आता ते शुक्रवारी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यासाठी येत आहेत.

Adam Mastar -Sushilkumar Shinde - Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : ...अन् फडणवीसांनी गाॅगल घातलेल्या शहाजीबापूंना 'हिरो'च बनवलं; पिक्चरही सांगितला

दुसरीकडे, आता सुशीलकुमारे शिंदे (Sushilkumar Shinde) आडम मास्तरांचे कौतुक करत आहेत. मास्तर यांनी कामगारांसाठी यापूर्वी सोलापुरात गोदुताई परुळेकर यांच्या नावाने वसाहत उभी केली आहे. असे असूनही ते निवडणुकीत पराभूत होता. हेही राजकारणच आहे. म्हणूनच नवोदित राजकारण्यांची या प्रकल्पाच्या प्रवासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Adam Mastar -Sushilkumar Shinde - Devendra Fadnavis
Shivsena News : 'मराठी माणसाला गुजरातचा गुलाम बनविणे हे दिल्लीचे कारस्थान!'; राऊतांचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com