Karad, 21 May : कराड तालुक्याच्या रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आघाडीने सर्वांना बरोबर घेण्याची खेळी केली असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपविरोधात मोट बांधण्याचे संकेत मिळत आहेत. संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते गटाला पवारांच्या पक्षाकडून बळ दिले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मात्री मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार मानसिंक नाईक, काँग्रेसचे पलूसचे आमदार विश्वजित कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कऱ्हाड, वाळवा, कडेगाव, शिराळा तालुक्यात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. या तालुक्यात अविनाश मोहिते (Avinash Mohite) गटाला तुतारीचे आणि हातचे पाठबळ मिळण्याची जोरदार चर्चा कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोरदारपणे होताना दिसत आहे.
विद्यामान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले (Suresh Bhosale) यांच्या गटासोबत भाजपची ताकद आहे. त्यांचा प्रत्येक अंदाज तालुक्यातील स्थानिक नेता घेताना दिसत आहे. सत्ता असताना डॉ. भोसले यांनी कृष्णेचा गड राखण्यासाठी तटबंदी मजबुतीचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे अविनाश मोहिते यांनी थेट बंडाचे निशाण हाती घेत सत्ताधाऱ्यांवर हल्ला केला आहे. त्यांना महाविकास आघाडी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मिळणारी रसद पाहता त्यांच्या आव्हानाला तुतारीचे बळ मिळेल, अशी स्थिती आहे.
निवडणूक कारखान्याची; टार्गेट भाजप
कऱ्हाड तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील, वाळव्यात माजी मंत्री जयंत पाटील, शिराळ्यात मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकांची चर्चा आहे. कडेगाव तालुक्यातून काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या गटाकडूनही भूमिका स्पष्ट नाही. त्याच तालुक्यातील संग्रामसिंह देशमुख यांचाही गट नक्की कोणती भुमिका घेणार याचीही जोरात चर्चा आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय स्थिती फायदा उठवत भाजपची आपापल्या परिसरातील ताकद यानमित्ताने कमी करण्याची रणनीती आखली जात आहे.
कृष्णेतील सत्तेची व्याप्ती सांगलीतही
कृष्णा कारखान्यात सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेतृत्व डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे आहे. त्यांच्या निर्विवाद सत्तेविरोधात पुन्हा एकदा माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे कृष्णाकाठचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याला मिळणाऱ्या राजकीय गणितांची जोड नव्या राजकीय हालचालींना गती देताना दिसत आहे. कृष्णेतील सत्ता कऱ्हाडपुरता मर्यादीत नसून त्याची व्याप्ती सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा तर काही पलूस परिसरातही आहे. त्यामुळे कृष्णेच्या सत्तेची नस पकडण्यासाठी स्थानिक राजकीय गणितेही महत्वाची ठरतात.
राष्ट्रवादीची संघर्षाची भूमिका
पाच तालुक्यांत निवडणुकीत पडद्यामागील भूमिका महत्वाच्या ठरतात. कारखान्यातील सत्ताधारी भोसले गटाला नव्हे, भाजप विरोधाचा डाव खेळण्याची तयारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून केली जात आहे. मोहिते गटाच्या आडून राष्ट्रवादीचा संघर्ष आगामी विधानसभेची पूर्वतयारी समजली जात आहे.
पाचही तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिका संभ्रमात
राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडूनही ठोस भूमिकेचा अभाव
दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह त्यांच्या समर्थकांची भूमिका महत्वाची
गावकीच्या राजकारणात पॅनेलपेक्षा अंडरकरंट ठरणार महत्वाचा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.