Solapur, 22 April : माढा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाने माघार घेतली असून, पक्षाचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) हा महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला आहे. शरद पवार यांनी आपल्या पक्षाकडून अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीत आपल्यावर अन्याय झाला आहे. आम्हाला गृहीत धरले जात आहे, असा आरोप करून माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. देशमुख यांना बारामतीत भेटायला गेले होते.
पवारांच्या भेटीनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती. मात्र, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन देशमुख (Sachin Desmukh) यांनी माढ्यातून शेकापच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला हेाता. त्यांचा अर्ज छाननीत मंजूरही झाला होता. मात्र, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पाठोपाठ शेकापचे सचिन देशमुख यांनीही माढ्याच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
R