Ganpatrao Deshmukh-Dr. Babasaheb Deshmukh-Shahaji Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Babasaheb Deshmukh Vs ShahajiBapu Patil : 'ती' टीका जिव्हारी; शेकापच्या देशमुखांनी शहाजीबापूंचा सगळा इतिहासच काढला

Deepak Kulkarni

Sangola News : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे नेहमीच त्यांच्या बेधडक विधानांमुळे चर्चेत असतात. काय झाडी काय डोंगर या डायलॉग एका रात्रीत फेमस झालेले बापू शिंदेंच्या सभाही गाजवू लागले. तर दुसरीकडे मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजीबापूंविरोधात आता शेतकरी कामगार पक्ष आक्रमक होऊ लागला आहे. आता शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आमदार बापूंना इशारा दिला आहे.

आमदार शहाजी पाटील यांनी माजी मंत्री व दिवंगत आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्यासह नातू डॉ.बाबासाहेब देशमुखांना टेंभूच्या पाण्यावरुन डिवचले होते. त्यांनी जे गणित आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं,आमच्या नादाला लागू नका असे आव्हान दिले होते. या आव्हानाचा देशमुखांनी खरपूस समाचार तर घेतलाच शिवाय आमदार पाटलांचा इतिहास काढला.

देशमुख काय म्हणाले...?

शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख म्हणाले,सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हिशोब, गणित घालायला विद्यमान आमदार माहीर आहेत.गेल्या तीस वर्षांपासून अशा हिशोबावरच त्यांची गुजराण आहे. अशा हिशोबातूनच 1999 ला हेच आमदार जेलवारीही करून आले आहेत, असे हिशोब घालूनच तुम्ही तालुक्यातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राखरांगोळी केली आहे.

त्यामुळे हिशोब, गणित घालायच्या भानगडीत पडू नका, आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल, या कडक शब्दांत शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांना इशारा दिला

टेंभूच्या पाण्याचे गणित आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं, आमच्या नादाला लागू नका या शब्दांत आ. शहाजी पाटील यांनी माजी मंत्री स्व.गणपतराव देशमुख यांच्यावर टीका करत नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आव्हान दिले होते. या आव्हानाचा डॉ. देशमुख यांनी खरपूस समाचार तर घेतलाच पण आ.पाटील यांचा उभा-आडवा इतिहासही चव्हाट्यावर मांडत त्यांच्या कारनाम्यांचे वाभाढे काढले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, "कोण किती पाण्यात आहे हे तालुक्यासह उभ्या राज्याला माहीत आहे. स्व.आबासाहेबांवर टीका करण्याची विद्यमान आमदारांची पात्रता नाही. स्वच्छ, निर्मळ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी म्हणून आबासाहेबांची देशभर ओळख होती. त्यामुळे आमचं गणित घालायच्या भानगडीत पडू नका असे आव्हानही त्यांनी शहाजी पाटलांना दिले आहे.

ते पुढे म्हणाले, पाण्यासारखे स्वच्छ, निर्मळ जगात काहीच नाही. त्यामळे पाण्यावर तुम्ही बोलणे म्हणजे पाण्याचा अपमान करण्यासारखे आहे. माण नदीचा तळ तुमच्याच बगलबवच्च्यांनी गाठला आहे. तुमच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्याचे इमले हा तळ शोधूनच वाढले आहेत. त्यामुळे आपल्याच जीवनवाहिनीला उघडीबोडकी करून तिला पुन्हा वस्त्र नेसवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीने चारवर्षांत तालुका रसातळाला नेल्याचा घणाघाती आरोपही डॉ. देशमुख यांनी केला.

आमच्यावर आबासाहेबांचे संस्कार आहेत, ते आम्ही प्राणापणाने जपू. त्यांचा नातू असल्याचा अभिमान तर आहेच, पण त्यांच्या विचारांचा जागर तूसभरही कमी होऊ देणार नाही. तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल, असा इशारा देखील बाबासाहेब देशमुखांनी यावेळी आमदार शहाजीबापूंना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT