Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad : रवींद्र गायकवाडांविरोधातला एक डाव उलटताच तानाजी सावंतांनी टाकला दुसरा डाव...

Dharashiv Mahayuti Melava : समन्वय समितीच्या मेळाव्यात कुरघोडी, प्रा.गायकवाड यांना बोलण्याची संधी नाही.
Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad
Tanaji Sawant Vs Ravindra GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे धाराशिवचे पालकमंत्रीही आहेत. शिवसेना शिंदे गटात असूनही माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नाही. यातूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रा. गायकवाड यांचे शिष्य, उमरगा-लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचा उल्लेख भावी खासदार असा केला होता. आमदार चौगुले यांनी लागलीच पत्रक काढून आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते. हा डाव उलटताच सावंतांनी दुसरा डाव टाकला.

महायुतीच्या समन्वय समिती मेळाव्याच्या पूर्वसंध्येला भावी खासदार असा उल्लेख असलेले डॉ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे पोस्टर समाजमाध्यमांत झळकले. त्यापाठोपाठ मेळाव्यात माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (रवी सर) ) यांना बोलण्याची संधीच देण्यात आली नाही.

Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad
Tanaji Sawant Vs Omraje Nimbalkar: '..तर म्हणाल ती पैज हरायला तयार'; तानाजी सावंतांचं ओमराजे निंबाळकरांना आव्हान!

आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे इतकी इच्छुकांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. ही संख्या तुलनेने महायुतीत अधिक आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या करिष्म्यात आपलीही नौका कडेला लागेल, असे इच्छुकांना वाटत आहे. यातूनच आदळआपट वाढत आहे. त्याची प्रचिती 14 जानेवारी रोजी धाराशिवसह राज्यात झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या काही ठिकाणच्या मेळाव्यांत आली.

धाराशिवला प्रा. गायकवाड यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, तिकडे बीडमध्ये मेळाव्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो लावण्याचा विसर पडला. अमरावतीतही कुरघोड्या झाल्या. कितीही आदळआपट केली तरी महायुतीतील पक्षांचे भाजपसमोर काहीएक चालणार नाही, असे चित्र दिसत असले तरी हा अतिआत्मविश्वास आणि आदळआपट महायुतीसाठी धोकादायक ठरू शकते.

धाराशिव येथील समन्वय समितीच्या मेळाव्यात माजी खासदार आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. प्रा. गायकवाड हे त्यांच्या अमोघ वक्तृत्वशैलीसाठी ओळखले जातात. जनमानसांत ते सहजपणे मिसळतात. 2014 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदारकीच्या शेवटच्या काळाच मात्र ते लोकांसाठी उपलब्ध नसायचे. त्यावरून काही स्वपक्षीयांसह विरोधकांनी त्यांच्यावर नॉट रिचेबल असा ठपका ठेवला, तो त्यांना कायमचा चिकटून बसला. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी मी नॉट रिचेबल होतो, मात्र लोकांची कामे थांबली नव्हती, लोक मला विविध माध्यमांतून संपर्क करायचे, असे स्पष्ट केले होते.

प्रा. गायकवाड यांचे राजकारण शिवसेनेतूनच सुरू झाले. त्यांनी एकदाही पक्ष बदलला नाही. ते बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. उमरगा मतदारसंघातून ते दोनवेळा आमदार, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून एकदा खासदार झाले. विविध कारणांवरून त्यांना शिवसेनेतून दोनवेळा काढून टाकण्यात आले होते. तरीही त्यांनी पक्ष बदलला नाही.

शिवसेनेने त्यांना पुन्हा प्रवेश दिला. शिवसेनेत फूट पडली, त्यावेळीही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. मात्र, काही दिवसांनंतर ते शिंदे गटात दाखल झाले. विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळू शकणार नाही, असा विचार करून कदाचित त्यांनी शिंदे गटाची वाट धरली असावी.

Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad
Chagan Bhujbal: जिल्हा बँकेच्या नोटीसीवरून भुजबळांचा थयथयाट; आम्ही तर म्हणतोय की सोडवा एकदाचे

समन्य समितीच्या मेळाव्यात आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) नेहमीप्रमाणे गरजले. बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. गंमत म्हणजे स्वतः सावंत हेच धाराशिव जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. स्वतःच्या प्रेमात अखंड बुडालेले सावंत यांचे भाषणही तशाच पद्धतीचे होते. सर्वकाही मी केले, असा त्यांच्या भाषणाचा रोख होता. खासदार राजेनिंबाळकर यांच्यावर टीका करतानाही त्यांचा रोख तसाच होता.

शिवसेना अखंड असताना सावंत यांची धाराशिव जिल्ह्यात एंट्री झाली. अर्थातच प्रा. रवींद्र गायकवाड यांना ते फारसे आवडले नव्हते, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याची पर्वा केली नाही. प्रा. गायकवाड यांनी धाराशिवसह शेजारच्या जिल्ह्यांतही शिवसेना रुजवण्यासाठी कष्ट घेतले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातून पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली आणि परिस्थिती बदलत गेली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिली नव्हती. प्रा. गायकवाड यांची उमेदवारी डावलण्यात आपलाच हात होता, अशी अप्रत्यक्ष कबुली पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या मेळाव्यात देऊन टाकली. विधानसभेला पडलेल्या उमेदवाराला (म्हणजे ओमप्रकाश राजेनिंबाळकर) उचलून मी खासदार केले, असे सावंत ओघात किंवा स्वतःचा मोठेपणा अधोरेखित करण्यासाठी म्हणून बोलून गेले. मात्र, प्रा. गायकवाड यांची उमेदवारी कापण्यात आपला हात होता, हे सावंत यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.

Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad
Eknath shinde : वादाची धग कायम; ठाकरेंची सर्वोच्च तर शिंदे गटाची नार्वेकरांविरोधात हायकोर्टात याचिका

आमदार चौगुले हे प्रा. गायकवाड यांचे शिष्य आहेत. हे राजकारणापुरेतच नाही. रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) ज्या महाविद्यालयात (श्री छक्षपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा) प्राध्यापक होते, त्याच महाविद्यालयात ज्ञानराज चौगुले हे प्रयोगशाळा सहायक होते. त्या अर्थानेही ते गुरु-शिष्य आहेत. उमरगा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यापासून सलग तिसऱ्या वेळी चौगुले विजयी झाले आहेत. आगामी निवडणुकीत ते विजयी झाले आणि महायुतीची सत्ता आली तर चौगुले यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावंत यांना एका दगडात दोन पक्षी मारायचे होते. त्यामुळे त्यांनी चौगुले यांचा भावी खासदार असा उल्लेख केला, मात्र चौगुले यांनी तो डाव उलथवून टाकला.

सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हेही आता लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातून इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रा. गायकवाड यांच्या उमेदवारीची वाट बिकट झाल्याचे दिसत आहे. लोकसभेची उमेदवारी मिळणार, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी प्रा. गायकवाड यांना दिला होता, असे सांगितले जाते. मात्र राजकारणात अशा गोष्टींना फार महत्व नसते. त्यामुळे सध्या तरी प्रा. गायकवाड अडचणीत दिसत आहेत.

Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad
Parbhani News : वादाच्या ठिणग्यावर ठिणग्या, मग 'मनोमिलन' कसे होणार ? महायुतीच्या मेळाव्यापासून गुट्टे, खान लांबच...

पालकमंत्री सावंत हे अद्याप एकदाही उमरग्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. तरीही काही दिवसांपूर्वी प्रा. गायकवाड हे सावंत यांच्यासोबत एका व्यासपीठावर आले होते. त्यामुळे मतभेद दूर झाले असतील, असे सर्वांना वाटत होते, मात्र मेळाव्यातील प्रकारामुळे पुन्हा शंका निर्माण झाली आहे. जागावाटप अद्याप झालेले नसताना महायुतीत अशा कुरघोड्या सुरू झाल्याचा संदेश जात आहे. धाराशिव मतदारसंघा भाजपने घेतला तर मग महायुतीतील अन्य सर्वच इच्छुकांचा भ्रमनिरास होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad
Indapur Politics : भरणेमामा म्हणतात, ‘गड्या आपली विधानसभाच बरी...!’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com