Solapur, 10 November : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राज्यभर प्रचारसभा होत आहेत. सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या दोन सभा होणार असून या दोन्ही सभा करमाळा आणि माढा मतदारसंघात होणार आहेत. करमाळ्यातून आमदार संजय शिंदे, माढ्यातून आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. या दोघांच्या विरोधात सभा देऊन राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना साथ देणाऱ्या शिंदे बंधूंवरील आपला राग कायम असल्याचे दाखवून दिल्याचे मानले जात आहे.
आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार नारायण पाटील, तर रणजितसिंह शिंदेंच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासाठी शरद पवार हे प्रचार संपण्याच्या एक दिवस अगोदर 17 नोव्हेंबर रोजी सभा घेणार आहेत. सोलापुरात दोन सभा देऊन राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना साथ देणारे शिंदे बंधू हे पवारांच्या निशाण्यावर असल्याचे यातून दिसून येत आहे.
मागील 2019 च्या निवडणुकीत माढ्यातून आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde)हे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हावर निवडून आले होते, तर करमाळ्यातून आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या दोघांनीही अजित पवार यांच्यासोबत जात शरद पवारांची साथ सोडली होती.
माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे निवडणूक न लढता आपल्या मुलाला रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून मुलाला उमेदवारी मिळावी, यासाठी बबनराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले होते. पवारांनी मात्र, बबनराव शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देणं टाळलं आहे.
बबनदादा यांनी मुंबईत आणि बारामतीत गोविंद बागेत जाऊन पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यांनी मोहिते पाटील यांच्याशी असणारा संघर्ष मिटवून त्यांची जुळवून घेण्याचीही तयारी दाखवली होती. मात्र, शेवटपर्यंत रणजितसिंह शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळू शकले नाही.
रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढ्यातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे टेंभुर्णी येथे 17 नोव्हेंबर रोजी सभा घेणार आहेत.
आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आमदार संजय शिंदे यांनी करमाळ्यातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे. याशिवाय दिग्विजय बागल हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्ह्यात सहा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. या सहा मतदारसंघांपैकी केवळ करमाळा आणि माढा या दोनच मतदारसंघात पवार सभा घेणार आहेत. या दोन्ही सभा ह्या शिंदे बंधूंच्या मतदारसंघात होणार आहेत, त्यामुळे शिंदे बंधू हे पवारांच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.