Solapur, 27 January : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (ता. 27 जानेवारी) शेवटचा दिवस होता. यात माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज शिवाजी सावंत हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. सावंत यांच्या विरोधात अर्ज भरणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे, त्यामुळे मानेगाव गटात आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा दुरंगी सामना रंगणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेसाठी (Solapur ZP) येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. त्यात माढा तालुक्यातील मानेगाव गटाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण या गटातून गेल्या वेळी तिरंगी लढत झाली होती.
मानेगाव गटातून माजी आराेग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सावंत यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत (Prithviraj Sawant) हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांनी पक्षाने उमेदवारी डावलल्यानंतर अपक्ष उमेदवारी दाखल केला होता. मात्र, साठे यांनी आज उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
साठे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज बापूसाहेब जाधव यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेना यूबीटीने सावंत यांना पाठिंबा दिल्याचे वृत्त जाहीर झाले आहे. मात्र, धनंजय डिकोळे यांनी ‘मानेगाव गटातून आम्ही कोणाला पाठिंबा दिलेला नाही’ असे स्पष्ट केले आहे.
माघारीनंतर मानेगाव गटात भाजपचे पृथ्वीराज सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास पाटील जांबगावकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. जांबगावकर हे भाजपचे नेते रणजित शिंदे यांचे एकेकाळचे निकटचे सहकारी होते. त्यांनी शिंंदे गटातून कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी या वेळी आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून झेडपीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
जिल्हा परिषदेच्या मागील २०१७ च्या निवडणुकीत मानेगाव गटातून तीन साखर कारखानदारांमध्ये लढत झाली होती. त्यात दादासाहेब साठे, रणजित शिंदे आणि पृथ्वीराज सावंत यांचा समावेश होता. त्या वेळी दादासाहेब साठे यांनी १२०० ते १३०० मते घेतली होती. तेवढ्याच मतांनी शिंदे यांनी सावंत यांचा पराभव केला होता. आता पुन्हा सावंत रिंगणात उतरले आहेत. त्यांचा सामना एकेकाळच्या शिंदे गटातील नेत्यांशी होत आहे.
मानेगाव, दारफळ गणातून ठाकरेंच्या उमेदवारांची माघार
मानेगाव पंचायत समिती गणातून राजेंद्र गोवर्धन शिंदे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी देखील माघार घेतली आहे. तसेच, दारफळ पंचायत समिती गणातून संगीता बाळासाहेब नाईकवाडे ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांनीही माघार घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.