Sindhudurg News : गेल्या काही दिवसापासून कोकणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू आहे. यामुळे शिवसेनेला गळती लागली असून नगरसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य देखील साथ सोडत आहेत. अशावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपण संघर्षासाठी तयार असून आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच जे पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये गेले आहेत, त्यांच्याकडे न बघडा पक्षासाठी काम करा असा सल्ला कुडाळ तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसैनिकांना दिला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून शिवसैनिकांत मात्र जोश निर्माण झाला आहे.
ठाकरे शिवसेना कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक सोमवारी (ता.३) महालक्ष्मी सभागृहात झाली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी प्रमुख श्रेया परब, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, एसटी सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
वैभव नाईक यांनी, अन्य पक्षात जे गेले ते केवळ स्वार्थासाठी गेले आहेत. ते विचारांसाठी गेले नाहीत. त्या लोकांवर टीका करण्यापेक्षा पक्षाच्या कामा लागा. पक्षाचे नेते उद्धव ठाकरे जे काम करत आहेत, ते लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन वैभव नाईक यांनी केले आहे. जिल्ह्यात सुरू झालेली अरेरावीची भाषा मोडून काढण्यासाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. हा संघर्ष करण्यासाठी पहिले पाऊले माझे असणार आहे. यातूनच विजय मिळवता येईल, असेही प्रतिपादन वैभव नाईक यांनी केले आहे.
जे अन्य पक्षात गेले त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नसून शेवटचा शिवसैनिक असेपर्यंत आपण काम करणार आहे. त्यामुळे कोणाच्या जाण्याने काडीचाही परिमाण होणार नाही. कारण जे गेलेत ते स्वार्थासाठी गेलेत. यावेळी त्यांनी शिवसेनेत गेलेल्या कुडाळच्या नगरसेवकांचे कारण सांगताना, विकास कामांना कमी पडणाऱ्या पैसांमुळे ते गेले. पण आपण सत्तेत नसतानाही प्रामाणिकपणे काम करत आहोत, हे चित्र समाजापर्यंत आले पाहिजे. समाज परिवर्तन झाले पाहिजे. जे गेले ते आपली ताकद देऊ शकत नाहीत, असे म्हटलं आहे.
अगोदरच शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये एवढा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे जे इकडून तिकडे गेलेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत तिकीट कसे मिळणार? हाच प्रश्न आहे. ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना लोकांचे प्रश्न सोडविणारी आहे. आता या ठिकाणी बोलणारे विद्यमान पालकमंत्री मटका, जुगार बंद करू, वाळू हप्ते बंद करू, असे सांगत आहेत. मात्र, सर्व काही त्यांच्याच राज्यात सुरू आहे. त्यांची चाललेली हुकूमशाही अरेरावीची भाषा आता मोडून काढण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यासाठी पहिली उडी माझी असेल, असे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
तेंडोलीतील ग्रामीण भागातील शिवसैनिक अविनाश तेंडोलकर यांनी यावेळी खळबळजनक दावा केला. तेंडोलकर म्हणाले, ‘‘मला निवडणुकीच्या धामधुमीत पाच लाखाहून 25 लाखांची ऑफर होती. पण, मी एक कडवा शिवसैनिक आहे. माझी पत्नी सरपंच म्हणून कार्यरत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत. त्यांच्याच शिवसेनेत आम्ही राहणार असल्याचे सांगून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा तेंडोलकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.