Shivaji Sawant  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shivsena : सोलापूरच्या शिवसेनेत मोठी घडामोड; तानाजी सावंतांच्या बंधूंचा संपर्कप्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा

Shivaji Sawant Resign Sampark Pramukh Post : सोलापूर शिवसेनेतील गटबाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आली आहे. शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 31 July : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठी घडामोड घडली आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी पक्षात सुरू असताना सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून इनकमिंग वाढले होते. अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) नेत्यांची गर्दी दिसून येत होती. एकीकडे इनकमिंग होत असताना पक्षासोबत पहिल्यापासून असलेले सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षातील गटबाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आली आहे.

शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात त्यांनी आपण जिल्हासंपर्क असूनही शिवसेनेच्या कामकाजात मला विश्वासात घेतले जात नाही. अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका मला न सांगता झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर माझ्या माढा तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुख यांच्या नेमणुकाही माझ्या अपरोक्ष झाल्या आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्यामुळे मी माझ्या जिल्हासंपर्क प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. यापुढे शिवसेनेत बाळसाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि आनंद दिघे यांचा सहवास लाभलेला शिवसैनिक म्हणून काम करणार आहे, असेही शिवाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे, त्यामुळे निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला तोटाच होण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्षात इनकमिंग होत असताना सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकणारे नेतृत्व पक्षात नसल्यामुळे शिवसेनेते काहींसा विस्कळीतपणा आल्याचे दिसून येते.

अनेक प्रमुख नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंंदे यांचे शिवसेना वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नव्या नियुकत्यांवरून पक्षात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे, त्यामुळे पक्षातील गटबाजीवर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे काय तोडगा काढणार, याकडे सोलापूरच्या शिवसेनेचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT