Satara, 06 January : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. त्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे महायुतीचे सरकार महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देत होते, त्यावेळी महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. तो दरोडा नव्हता का, असा सवाल शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदेंना विचारला आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे लाडकी बहीण योजनेला बदनाम करत आहेत, असा आरोपही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत डिसेंबरमध्ये लावलेल्या निकषाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
आमचं महायुतीचं सरकार ज्यावेळी महिलांना पंधराशे रुपये देत होते, त्यावेळी शशिकांत शिंदे यांच्या पक्षाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीने 3000 देण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ त्यांनी केलेली घोषणा हा दरोडा नव्हता का आणि आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली म्हणजे तो दरोडा झाला, ही दुटप्पी भूमिका म्हणावी लागेल. त्याचाच फटका बसल्यामुळे या योजनेला बदनाम करायचं काम चाललं आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जे या योजनेत बसत नाहीत, त्यांची तपासणी करून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी जाणीवपूर्वक नावे नोंदवून घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी हे नियोजन असल्याचेही मंत्री शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही भोसले यांनी पालकमंत्रिपदाबाबत स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गावर खिळे टाकून गाड्या पंक्चर करण्याचा प्रकार सुरू आहे. ही गंभीर बाब आहे. याबाबत आमचा बांधकाम विभाग एमएसआरडीसी यांना सूचना केल्या जाणार आहेत. जे कोणी समाजकंटक हे कृत्य करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.