sanjay ghatge sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Ghatge : कागलमध्ये महाविकास आघाडीला ठेंगा, ठाकरे गटाचे घाटगे करणार महायुतीला मदत

Rahul Gadkar

विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना कागल मतदार संघात हालचालींना वेग आला आहे. पारंपारिक मैत्री जपण्याचे संकेत देत शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते, संजय घाटगे यांनी महाविकास आघाडीलाच ठेंगा दाखविला आहे.

महायुती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांना विधानसभेला मदत करणार असल्याची घोषणा करत संजय घाटगे यांनी कागल विधानसभा मतदार संघातील लढतीचा उत्साह वाढवला आहे. महाविकास आघाडीमधून लढण्याबाबत ठाकरे गटाचा घाटगे गट आग्रही होता. त्याला आता घाटगेंच्या घोषणेनंतर पूर्णविराम मिळाला आहे.

2019 च्या विधानसभेला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे नेते, समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केला. मात्र, समरजितसिंह घाटगे ( Samarjit Singh Ghatge ) यांचा पराभव आणि मुश्रीफ यांचा विजयाला संजय घाटगे यांची उमेदवारी कारणीभूत ठरली होती. पण, यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानं कागलमधून महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार संजय घाटगे किंवा त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे हे विधानसभा लढविण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे कागलमध्ये तिरंगी लढतीचे संकेत मिळत होते. पण, त्यापूर्वीच संजय घाटगे यांनी आपली तलवार म्यान केली आहे.

संजय घाटगे म्हणाले, "विधानसभेच्या तोंडावर अनेक आश्वासने दिली जातात. पण, आम्हाला जनसामान्यांचा विकास पाहिजे आहे. या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, त्यांच्यासोबत राहू. या निर्णयाबद्दल कोणी कितीही काहीही बोलले तरी, आमची विचारधारा आणि दिशा बदलणार नाही."

"लोकसभेसाठी मी इच्छुक होतो. पण, काही लोकांनी माझ्यासंबंधीची कात्रणे वरिष्ठांना दाखवली. माझा भाजपला विरोध आहे. पालकमंत्री मुश्रीफ जर भाजपमध्ये असते तर मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. तुम्ही समतावादी नेते आहात. म्हणून आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहोत. कोणत्याही परिस्थितीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत," असा स्पष्ट इशारा कागलमधील मुश्रीफ यांच्या विरोधकांसह महाविकास आघाडीला घाटगे यांनी दिला.

"मागील विधानसभा निवडणुकीत मी मुश्रीफ यांच्याकडून पैसे घेऊन निवडणूक लढवली असा आरोप माझ्यावर करण्यात आला. पण, एक रुपयाही त्यांच्याकडून घेतलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते. तुम्ही माघारी घ्या. तुम्हाला विधानपरिषदेचे आमदार करतो. पण, उद्धव ठाकरे यांनी मला विश्वासाने उमेदवारी दिली होती. त्यांचा विश्वासघात करून मला विधान परिषदेचे आमदार काय कोणतेच पद नको होते," असे घाटगे यांनी स्पष्ट सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT