Kolhapur Political News : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून बांधणी सुरू आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर ताब्यात असणाऱ्या मतदारसंघावर प्रत्येकाने दावा सांगितला आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर तर सर्वच पक्षांनी आपली नजर ठेवली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी या मतदारसंघावर स्वतंत्र दावा केला आहे. अशातच कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरून आता महाविकास आघाडीतच मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी आढावा घेत चाचपणी केली. या बैठकीला शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे व माजी आमदार संजय घाटगे, डॉ. चेतन नरके उपस्थित होते. त्यामुळे या तिघांत मोठी चुरस निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर (Kolhapur) व हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने भगवा फडकवला होता. भाजप व शिवसेना युतीने एकत्र निवडणूक लढवली होती, पण शिवसेनेत दोन गट पडल्यावर आता दोन्ही गटांनी या मतदारसंघावर दावा ठोकला. तर या दोन्ही मतदारसंघांवर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यातील एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याची चर्चा आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून डॉ. चेतन नरके इच्छुक आहेत. आतापर्यंत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाण्याचे ध्येय नरके यांचे आहे. पण उपरा उमेदवार नको असे शिवसैनिकांचे मत आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेनेचे विजय देवणे आणि माजी आमदार संजय घाटगे यांची नावे चर्चेत आहेत. शिवाय संजय पवार यांच्या नावालाही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून पसंती आहे.
दरम्यान, चेतन नरके यांनाही तुमचे काम चालू ठेवा, असा संदेश (Matoshree) 'मातोश्री'वरून देण्यात आला आहे. शिवसेनेचा उमेदवार कोण याचा निर्णय घेताना तो पक्षाशी प्रामाणिक असावा आणि काँग्रेस व राष्ट्रवादीची त्याला संमती असावी, हा निकष ठरवण्यात येणार आहे. असे असेल तर डॉ. चेतन नरके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर सद्यःस्थितीत देवणे व घाटगे हेच दावेदार समजले जातात.
‘महाविकास’ची चर्चा करणार
शिवसेनेकडून स्वतंत्रपणे उमेदवारांची चाचपणी सुरू असली तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांची उमेदवाराविषयीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे हे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्यानंतर या घडामोडीला वेग येणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.