Bhagarth Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagarth Bhalke : भगीरथ भालके गटाचे नव्या राजकीय इनिंगचे संकेत; परिचारकांचा एकेकाळचा समर्थकही सोबतीला

Eknath Shinde's Shivsena : पंढरपूरचे भगीरथ भालके यांची शिंदेसेनेशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. तानाजी सावंतांना दिलेल्या जाहीर शुभेच्छांमुळे भालके नव्या राजकीय वाटचालीचे संकेत देत असल्याचे मानले जात आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 March : पंढरपूर विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविणारे भगीरथ भालके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी जवळीक वाढताना दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले शिंदे यांची मंगळवेढ्यात जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबन आवताडेंच्या कार्यालयात पहिल्यांदा जाहीरपणे स्वागत करून भेट घेतली होती. त्यानंतर भालकेंची शिंदेसेनेशी वाढलेली सलगी लपून राहिलेली नाही. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर शुभेच्छा देऊन भालके यांनी नव्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले आहेत.

विशेष म्हणजे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे एकेकाळची कट्टर समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसलेही आता भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या नव्या राजकीय इनिंगसोबत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरितच सोलापूर जिल्ह्यात शिंदेसेनेची ताकद वाढताना दिसत आहे.

भगीरथ भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, मतविभागणीमुळे भालके यांना विधानसभेत अपयश आले होते. त्यानंतर मात्र ते काँग्रेस पक्षापासून दोन हात अंतर ठेवून होते. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा शिंदे हे मंगळवेढ्यात बबन आवताडेंच्या कार्यालयात गेले होते.

मंगळवेढ्यात बबनराव आवताडेंच्या कार्यालयात भगीरथ भालके हे शिंदेंच्या स्वागताला उपस्थित होते. त्याचवेळी भालकेंच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पंढरपूर नगरपालिका निवडणूक भालके यांनी स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी भालकेंच्या पत्नी डॉ. प्रणिता भालके निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी शिंदेंची मुंबईत भेट घेतली होती.

नगरविकास मंत्रिपद एकनाथ शिंदेंकडून असून निधीसाठी आम्ही त्यांना भेटलो, असे त्यांच्याकडून कारण सांगितले जाते. मात्र भालके गटाची शिंदेंसोबतची जवळीक लपून राहिलेले नाही. जिल्ह्यात गलितगात्र झालेली काँग्रेस, नेतृत्वाची वानवा यामुळे भालकेंना शिंदेंचे नेतृत्व जवळचं वाटू शकतं.

भगीरथ भालके आणि नागेश भोसले यांनी आज माजी आरेाग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिर शुभेच्छा देऊन आगामी राजकीय वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आता भालकेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार की आपला गट कायम ठेवून स्वतंत्र वाटचाल करत राहतात, याकडे पंढरपूर-मंगळवेढ्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT