

Dahiwadi, 15 March : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील माण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समसमान कौल दिला आहे, त्यामुळे मंत्री गोरेंची प्रतिष्ठा घरच्या मैदानावरच पणाला लागली आहे. सभापतिपद आणि उपसभातिपदाचा निर्णय हा सोमवारी (ता. १६ मार्च) ईश्वरी चिठ्ठीवर ठरणार आहे, त्यामुळे ईश्वरचिठ्ठीचा कौल कोणाला मिळणार? सभापतिपदाची संधी भाजप की राष्ट्रवादीला मिळणार? याची चर्चा रंगली आहे.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकालाबाबत सर्वच राजकीय धुरिणांनी वर्तविलेले अंदाज फोल ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने माण (Maan) तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीचे पाच गण जिंकत बाजी मारली.
पंचायत समितीमध्ये भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समसमान म्हणजेच पाच- पाच सदस्य निवडून आले आहेत. सभापतिपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारण अर्थात खुले असल्याने निवडून आलेले सर्व दहा सदस्य सभापतिपदासाठी पात्र आहेत. त्यामुळे सभापतिपदासाठी प्रचंड स्पर्धा आणि उत्सुकता दिसून येत आहे.
भाजपकडून प्रामुख्याने आंधळी गणातून बिनविरोध निवडून आलेले अर्जुन काळे यांच्या नावाची चर्चा सभापतिपदासाठी सुरू आहे. त्यांच्यासोबत मलवडी गणातून निवडून आलेले बाळकृष्ण कदम, तर पळशी गणातून निवडून आलेले डॉ. राजेंद्र खाडे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, अर्जुन काळे यांचे नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरकुटे मलवडी गणातून निवडून आलेले विक्रम शिंगाडे आणि मार्डी गणातून निवडून आलेल्या प्रियांका जगदाळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार निकाल लागल्यापासून अज्ञातस्थळी रवाना झालेले आहेत.
भाजपच्या उमेदवारीचे सर्वाधिकार ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आहेत, तर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याचा निर्णय स्थानिक पातळीवर प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, मनोज पोळ हे घेणार की वरिष्ठ यात लक्ष घालणार, यावर बरंच काही अवलंबून आहे.
उपसभापतिपदी वर्णी कोणाची?
एकाचवेळी सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सभापती नाही, तर किमान उपसभापतिपदाची तरी उमेदवारी मिळावी आणि नशिबाने साथ द्यावी, अशी प्रार्थना काहीजण करत आहेत.
प्रवीण साळुंखे पीठासीन अधिकारी
माण पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापतिपदासाठी पीठासीन अधिकारी उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे यांच्या उपस्थितीत उद्या निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार सकाळी ११ ते ११:३० पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. सकाळी ११:३१ ते १२ पर्यंत विशेष सभेचे कामकाज सुरू करून अर्जांची छाननी करण्यात येईल. दुपारी १२:०१ ते १२:३० पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. दुपारी १२:३१ पासून आवश्यकता भासल्यास मतदान घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.