पक्षातील दुर्लक्ष: माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा कोणत्याही वरिष्ठ नेत्यांचा त्यांना फोन आलेला नाही, ज्यामुळे त्यांना पक्षाकडून दुर्लक्ष झाल्याची खंत वाटते.
निष्ठेची किंमत नाही: त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेला आता किंमत नसल्याचे सांगत भाजपमध्ये निष्ठेला मान मिळतो, असे मत व्यक्त केले.
भाजप प्रवेशाची शक्यता: त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असून, भाजपमध्ये प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
Solapur, 19 October : मला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आलेला नाही. मी गेली 35 वर्षे पक्षात काम करतोय. आमच्या जाण्याने त्यांना काही फरक पडणार नसेल म्हणून त्यांनी कॉल केला नसेल. तसेच, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता निष्ठेला फारशी किंमत राहिलेली नाही, अशी खंतही माजी आमदार राजन पाटील यांनी बोलून दाखवली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माजी आमदार राजन पाटील हे प्रथमच माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोन आला नसल्याचे स्पष्ट केले. माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने आणि बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह आणि विक्रम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून हे सर्वजण भाजपत प्रवेश करणार आहेत.
राजन पाटील (Rajan Patil) म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जिल्ह्यातील दोघे-तिघे गेलो होतो. प्रत्येकाच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. आमच्या इथले सर्व लोकप्रतिनिधी विरोधी पक्षातील असल्यामुळे आमच्या इथला विकास मंदगतीने चालू आहे. त्यामुळे या गतीला भरारी यावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो.
आम्ही अनेक वर्ष विधिमंडळात एकत्रित काम केल्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत आमचे जुने संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण करतो, असं आश्वासन दिलं आहे, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रवेशाबाबत राजन पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. मुख्यमंत्री याबाबत जो निर्णय घेतील, त्याबाबत जिल्ह्यातील आम्ही तीन ते चार जण सकारात्मक होकार देऊ.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विधीमंडळामध्ये जाण्याचा योग आणून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढे जाऊन दोन राष्ट्रवादी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे शिस्तप्रिय आहेत. त्यांची शिस्तप्रियता आवडली; म्हणून आम्ही त्यांच्या पक्षात गेलो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अतिशय शिस्तप्रिय आहेत. मात्र राज्यातील पक्षात अतिशय बेशिस्तपणा वाढलेला दिसून येतोय, असेही पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेला फारशी किंमत राहिलेली नाही. त्या उलट भाजपत निष्ठेला किंमत आहे. अजितदादा पवार, सुनील तटकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. मात्र पक्षात शिस्त राहिली नाही माझ्यापेक्षा त्या पक्षात अतिशय अनुभवी स्वच्छ पारदर्शी भ्रष्टाचाराचा डाग नसलेले अन्न हजारे यांच्यापेक्षा प्रामाणिक लोक आहेत.
उमेश पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, मी बारक्या लोकांवर फारसे बोलत नाही. त्यांची तुलना जर तालुक्याचे नेते म्हणत असाल तर ते दुर्दैवी असेल. भाजप पक्षात शिस्त आहे; म्हणून आम्ही भाजप पक्ष चांगला म्हणतो. पक्षप्रवेशाची तारीख ठरायला ते काय लग्न आहे का?
Q1. राजन पाटील यांनी अजित पवारांविषयी काय सांगितले?
A1. अजित पवार यांचा फोन आलेला नाही आणि त्यांनी संपर्क साधलेला नाही.
Q2. राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा विचार करत आहेत का?
A2. होय, त्यांनी भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
Q3. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणती टीका केली?
A3. पक्षात निष्ठेला किंमत उरलेली नाही आणि शिस्त हरवली आहे, अशी टीका त्यांनी केली.
Q4. भाजपबद्दल त्यांनी काय मत व्यक्त केले?
A4. भाजपमध्ये शिस्त आणि निष्ठेचा सन्मान असल्याने तो पक्ष चांगला असल्याचे त्यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.