Congress Candidate List Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : महाआघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम; काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही सोलापूरला ठेंगाच!

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. एकाच मतदारसंघावर या दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 26 October : काँग्रेसने आज विधानसभेच्या २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे, त्यात सोलापूर जिल्ह्यातील एकाही मतदारसंघाचा समावेश नाही. सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या हक्काच्या दोन जागांवरही काँग्रेस पक्ष उमेदवार जाहीर करू शकलेला नाही. या दोन्ही जागांवर मित्रपक्षांनी दावा केल्याने काँग्रेसची अडचण वाढली आहे.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात जोरदार धुमश्चक्री आहे. एकाच मतदारसंघावर या दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे.

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर मतदारसंघातून शिवसेना (Shivsena UBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, मागील २०१९ च्या निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाने (Congress) लढवली आहे, त्यामुळे दक्षिणवरील दावा सोडण्यास काँग्रेसकडून नकार देण्यात येत आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतदारसंघावरून वाद वाढला आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. माने गटाकडून झालेल्या हालचाली पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याशी संपर्क साधून दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रस पक्षालाच सुटणार आहे. कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण सोलापूरचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या यादीत होणे अपेक्षित होते. मात्र, आज सकाळी जाहीर झालेल्या यादीत सोलापूरच्या दोन्ही जागांचा निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, मित्रपक्ष शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यांनी अजूनही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यामुळे दक्षिणचा तिढा कायम आहे.

सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे ह्या तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. मात्र, त्याच मतदारसंघावर महाविकास आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दावा केलेला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाची अडचण वाढली आहे.

सलग तीन निवडणुकांमध्ये प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून बाजी मारलेली आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाकडूनही शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्ष सोडायला तयार नाही. एकीकडे काँग्रेस पक्ष शहर मध्य सोडायला तयार नाही, तर आडम मास्तरही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT