Solapur DCC bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : बड्या नेत्यांच्या संस्थांवरील कारवाई सेकंड चार्जमुळे थांबली; गोपीनाथ मुंडेंसारखं धाडस सोलापूरचे नेते दाखवतील काय?

प्रमोद बोडके

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सहकारी बँकेपेक्षा अधिक कर्ज देऊनही शंकर सहकारी साखर कारखाना, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना आणि सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना यांच्यावरील कारवाई फक्त सेकंड चार्जमुळे थांबली आहे. बँकेचे हित आम्ही पाहतो; म्हणून जाहीरपणे सांगणारे आता का बोलत नाहीत? याचे कोडे संपूर्ण जिल्ह्याला पडले आहे. (Solapur DCC: Action against organizations of big leaders stopped due to second charge)

सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (District Bank) माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याला ३३ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. त्या पैकी एकही रुपयाची परतफेड न केल्याने तब्बल ६४ कोटी रुपयांचे व्याज कारखान्याकडे थकीत आहे. या कारखान्याकडून जिल्हा बँकेला ९७ कोटी रुपये येणे अपेक्षित असताना जिल्हा बँक आज काहीही कारवाई करू शकत नाही.

तशीच परिस्थिती अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आहे. या कारखान्याला जिल्हा बँकेने ५८ कोटी ४७ लाखांचे कर्ज दिले आहे. या कारखान्याने व्याजाचे १२६ कोटी थकवले आहेत. या कारखान्याकडून बँकेला १८५ कोटी रुपये येणे बाकी आहे. सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने ३५ कोटी रुपये कर्ज दिले आहेत. या कारखान्याच्या व्याजाचे १०१ कोटी झाले आहेत. या कारखान्याकडून जिल्हा बँकेला १३७ कोटी रुपये येणे बाकी आहेत.

राज्य सहकारी बँकेने दिलेल्या कर्जामुळे सोलापूर जिल्हा बँकेला कर्ज वसुलीचा अधिकार नाही. आपली जिल्हा बँक सर्वाधिक कर्ज देऊनही सेकंड चार्जवर आहे. राज्य सहकारी बँकेला फर्स्ट चार्ज देत असताना संचालक काय करत होते? याचे उत्तर आता शोधण्याची गरज आहे. व्याज राहू द्या किमान मुद्दल तरी द्या... या वाईटात वाईट परिस्थितीला अनेक जण आले आहेत. पण, शेतकऱ्याला तीन लाखांपर्यंत बिनव्याजी आणि कारखानदारांना कोट्यावधी बिनव्याजी? याचे उत्तर कोण देणार?

कोण आडकणार?, कोण सुटणार

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारण आणि प्रशासनातील अनेक संचालक, अधिकारी सहकार कायदा कलम ८८ मध्ये अडकले आहेत. यातील अनेकजण भावी आमदार आणि भावी खासदार असणार आहेत. यातील कोण अडकणार आणि कोण सुटणार? याचे कोडे जिल्ह्याला पडले आहे. जिल्हा बँकेचा प्रशासकिय प्रमुख तत्कालिन सरव्यवस्थापक ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवीकेचा कसा असू शकतो? असे अनेक प्रश्न येत्या काळात उपस्थित होऊ शकतात.

गोपीनाथ मुंडेंनी भरले होते पैसे

राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार संचालकांच्या विरोधात कारवाई मोहीम राबाविली होती. त्यावेळी बीड लोकसभेचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्हा बँकेची थकबाकी भरली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोलापूर जिल्ह्यातील केगाव येथील दंत महाविद्यालयाला कर्ज दिले होते. या कर्जाची रक्कम गोपीनाथ मुंडे यांनी भरली होती. सोलापूरच्या बाबतीत काय घडतंय? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT