Solapur News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून प्रणिती शिंदेंचे नाव जाहीर केले. काँग्रेस हायकमांडजवळ शिंदे यांचे अद्यापही तितकेच वजन असल्याने प्रणिती शिंदे याच लोकसभेच्या उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची धुरा सांभाळणाऱ्या एकमेक लोकप्रतिनिधी प्रणिती शिंदे यांनी देखील लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपने सलग दोनवेळा सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे. 2019 च्या निवडणुकीवेळीच शिंदे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. आता सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांची लेक आणि सोलापूर शहर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे. प्रणिती शिंदे यांना विधानसभेच्या तीन टर्मचा अनुभव आहे. शिवाय त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे.
प्रणिती यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे दिल्लीत सोलापूरचे नेतृत्व करण्यासाठी प्रणिती शिंदे या योग्य उमेदवार असल्याचे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे हे देखील मुलीच्या खासदारकीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी सक्रीय झाले आहेत. यासाठी त्यांनी जुन्या सहकाऱ्यांच्या गाठी-भेटी, पक्ष प्रवेश, मतदासंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरुवात केली आहे.
विधानसभेत सलग तीन टर्म सोलापूर शहर मध्यचे नेतृत्व करणाऱ्या प्रणिती शिंदे यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघात म्हणावा तितका वावर नाही. पंरतु आता मात्र आता लोकसभेच्या आखाड्याची तयारी करण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी सुत्रे हाती घेत लोकसभा मतदारसंघात गाठी भेटी दौरे सुरू केले आहेत. कार्यकर्त्यांची मोट बांधल्याशिवाय लोकसभेची वाट सुकर नसल्याची जाणीव प्रणिती शिंदे यांनाही झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमकूवत आहे, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली आहे.
गेल्याच आठवड्यात प्रणिती यांनी मंगळवेढा येथे शहर व तालुका काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळांना भेटी देऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात उचलून धरणार असल्याचेही स्पष्ट केले. तसेच पक्ष वाढीसंदर्भात बोलताना शिंदे यांनी जिल्ह्यात काँग्रेसची वाताहात झाल्याचेही कबुली दिली. मात्र, यापुढे कार्यकर्त्यांच्या हाकेला साद देत मी त्यांच्यासाठी उपस्थित राहणार असल्याचेही प्रणिती शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.
सोलापूर मतदारसंघात सोलापूर उत्तर, दक्षिण, मध्य, मोहोळ, अक्कलकोट आणि पंढरपूर-मंगळवेढा या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. आघाडीच्या जागा वाटपामध्ये सोलापूर दक्षिण, मध्य,अक्कलकोट आणि-पंढरपूर-मंगळवेढा हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. यातील पंढरपूर-मंगळवेढा राष्ट्रवादीकडे गेला आहे. त्या बदल्यात आगामी निवडणुकीत काँग्रेसला दुसरा मतदारसंघ मिळेल.
राज्यात झालेल्या राजकीय घडामोडी आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते देखील बदलेली आहेत. सद्यस्थितीत बहुतांश लोकप्रतिनिधीकडे पक्ष निष्ठेचा अभाव असून 'खोबरं तिकडे चांगलभले' या भूमिकेत ते वावरताना दिसतात. असे असले तरी पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ असलेला मतदार आगामी निवडणुकीत दलबदलू लोकप्रतिनिधींना योग्य धडा शिकवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहिली नाही. या मतदारसंघात 6 पैकी केवळ सोलापूर मध्य हा प्रणिती यांचाच एक मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. उर्वरित पाचही मतदारसंघांत सध्याच्या स्थितीत सत्ताधारी पक्ष आणि गटाचे वर्चस्व आहे. सोलापूर दक्षिण, उत्तर, पंढरपूर-मंगळवेढा आणि अक्कलकोट मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रतिनिधित्व करत आहेत. तर मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. पंरतु राष्ट्रवादीतील फुटीनंतर येथील आमदार माने यांनी अजित पवार गटाला साथ देत सत्तेत सहभागी होणे पसंद केले आहे.
परिणामी आमदार मानेंच्या डोक्यावर हात ठेवणारे अनगरचे पाटील पिता पुत्र देखील अजित पवार गटातच सहभागी झाले आहेत. पण येथेही उमेश पाटलांचा वावर असल्याने भविष्यात अनगरकर पाटलांनी हाती कमळ घेतल्यास नवल नसेल. तर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार देखील भाजपचे जय सिद्धेश्वर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना प्रणिती शिंदे यांना सुशीलकुमार शिंदेंपेक्षा अधिक संघर्ष करावा लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात प्रणिती शिंदे या जरी नवख्या असल्या तरी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जनसंपर्काचा प्रणिती यांना फायदा होऊ शकतो. सुशीलकुमार शिंदे यांनींही निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेत असताना पक्षाला गरज असेल तिथे मदत करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने शिंदे अॅक्टिव्ह होताना दिसून येत आहेत. प्रणिती शिंदेंमुळेच पक्षात नाराज झालेल्या जुन्या नव्या साथीदारांना सोबत घेऊन शिंदे यांना लेकीसाठी लोकसभेची रणनीती आखावी लागणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी बेरजेचे राजकारण करत हातमिळवणी करण्यासाठी शिंदे यांनी पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील किंग मेकर राजन पाटील यांची भेट घेत चर्चा केली होती. त्याचप्रमाणे शिंदे यांनी ग्रामीण भागातील इच्छुक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण उत्तर मतदारसंघामध्ये माजी आमदार दिलीप माने यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी काळात माने यांच्याशी शिंदे जुळवून घेतात का हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.