SushilKumar Shinde : लै अवघड हाय गड्या उमगाया बाप रं...

Congress News : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे वयाच्या ८२ व्या वर्षीही लेक, पक्षासाठी उतरले मैदानात..
SushilKumar Shinde, Praniti Shinde
SushilKumar Shinde, Praniti Shinde Sarkarnama

स्वतःही कर्तृत्ववान असलेले हे नेते एका कर्तृत्ववान लेकीचे वडीलही आहेत. त्यांचे वय आहे ८२ वर्षे. आयुष्यभर भरभरून दिलेल्या पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी, लेकीचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी हा बाप या वयातही मैदानात उतरला आहे. गेल्या काही वर्षांत पक्षासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ते निधड्या छातीने पुढे निघाले आहेत...होय, सुशीलकुमार शिंदेच, राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती यांना आता घडीभर थांबून आपल्या बापाची धाप ऐकावी लागणार आहे, कार्यशैलीत बदल करावा लागणार आहे.

सोलापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. लोकसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दोन वेळा पराभव झाला आणि या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. आता काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, लेकीची कारकीर्द आणखी पुढे नेण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी जमिनीवर उतरून काम सुरू केले आहे. लेकीच्या म्हणजे आमदार प्रणिती शिंदे यांच्या स्वभावामुळे नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुशीलकुमार शिंदे यांनी सुरू केले आहे.

शिंदे यांचे वय ८२ आहे. या वयातही त्यांनी तरुणाईला लाजवेल अशा पद्धतीने काम सुरू केले आहे. प्रणितीताई शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या दोन निवडणुकांत तर त्यांनी प्रचंड संघर्ष करून, विविध संकटांवर मात करून धडाकेबाज विजय मिळवला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आता प्रणिती यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो. विविध गट-तटांना सामावून घेऊन काम करावे लागते. यामुळेच सुशीलकुमार शिंदे हे मैदानात उतरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

SushilKumar Shinde, Praniti Shinde
Barsu Refinery : बारसू रिफायनरीसाठी बंद पडद्याआडचे ‘उद्योग’! कोकणवासीय वाऱ्यावर...

काँग्रेसला नवसंजीवनी...

पक्ष म्हटला की गटबाजी आलीच. त्याला सोलापुरातील काँग्रेसही अपवाद नाही. काँग्रेसचा सध्या पडता काळ सुरू आहे. अशा काळात सर्व गट-तटांना सोबत घेऊन पक्षसंघटन मजबूत करण्याचे कौशल्य प्रणितीताईंनी दाखवायला हवे होते. मात्र, तसे होताना दिसत नव्हते. आपल्या गटाच्याच कार्यकर्त्यांचीच सगळीकडे चलती असावी, असा प्रयत्न प्रणितीताईंच्या समर्थकांकडून सुरू झाला. त्यामुळे अन्य गटांच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होऊ लागली. अगदी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकांनाही डावलले जाऊ लागले. प्रणितीताईंच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर अनेक कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. हे असे चालणार नाही, आता सरंजामी कार्यपद्धती धोकादायक ठरू शकते, हे अखेर सुशीलकुमार शिंदे यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते सक्रिय झाले आहेत. काँग्रेस सोडून गेलेल्या काही जुन्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुन्हा पक्षात प्रवेश दिला आहे. आणखीही काही कार्यकर्ते, नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रणिती तिकडे तेलंगणात काँग्रेसच्या प्रचारात व्यग्र होत्या आणि इकडे सुशीलकुमार शिंदे यांनी सूत्रे हाती घेऊन काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम धडाक्यात सुरू केले.

कार्यकर्त्यांची फळी तयार करावी लागणार...

प्रणिती यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांचा मतदार पक्का केला आहे. त्या नव्या माणसांना जोडत होत्या, त्याचवेळी अनेक जुन्या कार्यकर्त्यांना अपमानित होऊन काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. त्यात माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

काँग्रेस पक्षात वेगळी ओळख निर्माण करणे म्हणजे प्रणितीताई यांचे शत्रुत्व ओढावून घेणे, अशी परिस्थिती त्यांच्या मतदारसंघात झाली आहे. काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत चांगल्या पदावर संधी द्यावी, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस समितीला लेखी कळवले होते. सदस्य नोंदणी मोहिमेत माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्या काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या. तरीही फिरदोस पटेल या तरुण नेतृत्वाला डावलून ज्येष्ठ महिलेची या पदावर वर्णी लावण्यात आली. लोकसभा लढवायची झाल्यास प्रणितीताई यांना पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यांत नव्याने कार्यकर्त्यांची फळी तयार करावी लागणार आहे. याला वेळ लागेल हे लक्षात आल्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकर्ते सांगतात.

सरकारच्या त्रुटी शोधाव्या लागतील...

धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी निवडलेल्या तालुकाध्यक्षांवरून मागे वाद निर्माण झाला होता. प्रकरण थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत गेले होते. सुशीलकुमार यांनी त्या प्रकरणावर आता पडदा टाकला आहे. धवलसिंह यांनी नेमलेल्या सर्व तालुकाध्यक्षांच्या कार्यपद्धतीचा सुशीलकुमारांनी धवलसिंह त्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. तालुकाध्यक्षांना मार्गदर्शन केले. त्यांना कार्यक्रम दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केवळ वरपांगी टीका करून चालणार नाही. त्यांच्या धोरणांतील त्रुटी, दोष समाजावून सांगावे लागतील, याची जाणीव शिंदे यांना नक्कीच आहे. मात्र, सोलापुरात वेगळेच घडत होते. मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका करणे, काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करून त्याची छायाचित्रे माध्यमांना पाठवणे, म्हणजे पक्षकार्य नव्हे. सरकारच्या धोरणांचा अभ्यास करून त्रुटी शोधाव्या लागतील, त्या लोकांसमोर मांडाव्या लागतील, असा संदेश शिंदे यांनी पक्ष-संघटनेत दिला आहे.

SushilKumar Shinde, Praniti Shinde
Baban Shinde : अजित पवार गटाच्या आमदार पुत्राला सहा महिन्यांची शिक्षा...

कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू...

सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणुकीच्या राजकारणातून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. अशी घोषणा त्यांनी यापूर्वीही केली होती. मात्र, ते पुन्हा रिंगणात उतरले हाेते. या वेळी तशी शक्यता दिसत नाही. लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांत सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे लेकीसाठी त्यांनी आता सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. प्रणिती शिंदे यांच्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. केवळ संदेश न देता सुशीलकुमार शिंदे हे स्वतःही कामाला लागले आहेत.

Edited by: Mangesh Mahale

SushilKumar Shinde, Praniti Shinde
Jitendra Awad : 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही; आव्हाडांनी अजितदादांना सुनावलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com