Shiv Sena, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shiv Sena : सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड राडा; शिवसैनिक संपर्कप्रमुखांच्या अंगावर धावून गेले

Uddhav Thackeray Shivsena : सोलापूरमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर उत्तर-मध्य विधानसभा आढावा बैठकीत सोमवारी मोठा 'राडा' झाला. संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यावर 'गद्दारांवर कारवाई कधी करणार' असा थेट जाब विचारत संतप्त शिवसैनिक धावून गेल्याने एकच खळबळ उडाली.

सरकारनामा ब्यूरो

-प्रभू वारशेट्टी

Solapur News: सोलापूरमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर उत्तर-मध्य विधानसभा आढावा बैठकीत सोमवारी मोठा 'राडा' झाला. संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यावर 'गद्दारांवर कारवाई कधी करणार' असा थेट जाब विचारत संतप्त शिवसैनिक धावून गेल्याने एकच खळबळ उडाली. 'कारवाई करणार नसाल, तर पक्षाचे कामकाज बंद ठेवू', असा निर्वाणीचा इशाराही शिवसैनिकांनी यावेळी दिला.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोरच गोंधळ

​ही बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर आणि प्रताप चव्हाण, महिला आघाडीच्या शहर संघटिका अमिता जगदाळे यांच्या उपस्थितीत सुरू होती. शिवसैनिकांनी अचानक थेट संपर्कप्रमुखांनाच लक्ष्य केल्यामुळे गोंधळ उडाला. निष्ठावंत शिवसैनिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूरच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील अंतर्गत राजकारण मात्र ढवळून निघाले आहे.

बैठकीत नेमके घडले काय?

​गद्दारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होण्यास विलंब होत असल्याचा संताप शिवसैनिकांच्या मनात आधीपासूनच होता. त्यातच, संपर्कप्रमुख अनिल कोकीळ हे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या विरोधात गद्दारांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आणि तक्रारींबद्दल कोणतीही दखल घेत नाहीत, अशी भावना शिवसैनिकांमध्ये पसरली होती.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख कोकीळ यांना घेरत पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दारांवर कारवाई करण्याबाबत चालढकल नेहमीच होते. पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून शिवसैनिक शांत राहतात. नेते मात्र मुंबईला निघून गेल्यानंतर सर्व काही विसरतात असा, थेट आरोप शिवसैनिकांनी केला.

संपर्कप्रमुख हटावचा नारा

​संपर्कप्रमुख कोकीळ यांनी ' या विषयावर आपण वेगळी बैठक घेऊ' असे सांगूनही शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ​संतापलेल्या शिवसैनिकांनी कोकीळ यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत "कारवाई करा नाहीतर संपर्कप्रमुख हटाव" असा थेट नारा दिला.

लॉबीकडून शिवसैनिकांना दाबण्याचा प्रयत्न

​काही विशिष्ट शिवसेना (Shivsena) पदाधिकारी आणि नेत्यांकडून शहर व जिल्ह्यातील काम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे ही वेळ आल्याचेही शिवसैनिकांनी वरिष्ठ नेत्यांसमोर स्पष्ट केले.

गद्दारांना अंदाज म्हणून बैठकीस गैरहजर

आजच्या बैठकीत गद्दारांचे पितळ उघडे पडेल या भीतीने गद्दार गैरहजर राहिले अशी चर्चा बैठकीनंतर रंगली होती. चर्चेचा रोख माजी जिल्हाप्रमुखांकडे असल्याची कुजबुज शिवसैनिकांमध्ये होती.

आरोप असलेल्या नेत्याची विश्रामगृहात संपर्कप्रमुखांची भेट

आढावा बैठकीत गद्दार म्हणून आरोप झालेल्या माजी जिल्हाप्रमुख नेत्याने रात्री उशिरा शासकीय विश्रामगृहावर संपर्कप्रमुखांची भेट घेऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी शिवसैनिकांची मागणी होती. कोणताही गोंधळ झाला नाही. उलट पक्षात चांगले काम करणाऱ्यांचा व माझाही सत्कार यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यांनतर महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

- अजय दासरी, जिल्हाप्रमुख

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काही शिवसैनिकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. पक्षाची ही घरगुती बाब आहे.

- चंद्रकांत खैरे, माजी खासदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT