Sushilkumar Shinde-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde's Regret : काँग्रेसमधील काहींनी अजूनही माझे नेतृत्व स्वीकारले नाही; सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वाच्या आवाहनावर प्रणितींची खंत

Sushilkumar Shinde : ‘तुला ज्या जनतेने निवडून दिले आहे. त्यांची तू सेवा कर. त्यांच्या जीवावरच यापुढे तू राज्य करावे

अरविंद मोटे

Solapur, 15 June : ‘तुला ज्या जनतेने निवडून दिले आहे. त्यांची तू सेवा कर. त्यांच्या जीवावरच यापुढे तू राज्य करावे. आता मी तुझा नेता नसून तूच आमच्या सर्वांचे नेतृत्व करावे,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपला कारभार लेकीच्या हाती सोपविला. मात्र, प्रणिती शिंदे यांनी ‘काँग्रेसमधील काही नेत्यांनी माझे नेतृत्व अजूनही स्वीकारले नाही,’ अशी खंत व्यक्त केली.

सोलापूरमधून विजयी झालेल्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघात कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले आहे. दक्षिण सोलापूरमधील कृतज्ञता मेळावा सोलापूर शहरात आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी प्रणिती शिंदे यांना नेतृत्व करण्याचे आवाहन केले. त्यावर बोलताना प्रणिती यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

कृतज्ञता मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या आव्हानाला उत्तर देताना प्रणिती शिंदे यांनी एक प्रकारची खंत व्यक्त केली. काँग्रेसमधील काही नेत्यांनी अजूनही माझे नेतृत्व स्वीकारले नाही. त्यासाठी आम्हाला अजूनही तुमची (सुशीलकुमार शिंदे) गरज आहे, असे प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी दक्षिण सोलापूरचा खातेदार आहे, माझी शेती दक्षिण सोलापूरमध्येच आहे, त्यामुळे आजच्या मेळाव्यात आम्हा तिघांचीही (प्रणिती शिंदे, उज्ज्वला शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे) भाषणे आहेत. दक्षिण सोलापूर हा, आनंदराव देवकते, वि.गु. शिवदारे, गुरुनाथ पाटील यांचा तालुका आहे. हा त्यागाचा तालुका आहे.

देवकाते यांनी आमच्यासाठी मोठा त्याग केला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आनंदराव देवकाते यांनी दक्षिण सोलापूरच्या आमदाराकीचा राजीनामा देत माझ्यासाठी मतदारसंघ रिकामा करून दिला. त्यामुळे देवकते परिवाराचे उपकार आम्ही शिंदे कुटुंबीय कधीही विसरू शकत नाही, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

टाकळीमध्ये बीएसएफ आणले होते. त्यासाठीच्या इमारती बांधून तयार आहेत. मात्र, काँग्रेस आणि मला त्याचे श्रेय भेटेल म्हणून त्या ठिकाणी भाजपने पुढे काहीही होऊ दिलं नाही, असा आरोपही शिंदे यांनी केला. ते म्हणाले, पाच आमदार आणि दोन मंत्री हे प्रणितींच्या विरोधात लोकसभा मैदानात लढत होते. मात्र, सर्वसामान्य जनतेने आपले आशीर्वाद प्रणितींच्या पाठीशी उभे केले, याचा मला आनंद आहे.

शरद पवारांच्या पक्षाचे सैनिकही प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी कामाला लागले होते. शिवसेनेचे अमर पाटील यांनीही परिश्रम घेतले, असे सांगून सुशीलकुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केलेल्या मदतीबद्दल जाहीर आभार मानले.

दक्षिण सोलापूरला त्यागाची मोठी पार्श्वभूमी : उज्ज्वला शिंदे

दक्षिण सोलापूर तालुक्याला त्यागाची मोठी पार्श्वभूमी आहे. येथील आनंदराव देवकते यांनी केंद्रातून परत मुख्यमंत्रिपदावर परत आलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता, अशी आठवणही उज्ज्वला शिंदे यांनी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT