Rajesh Patil-Shavaji Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandgad : चंदगडमध्ये महायुतीत उभी फूट; राष्ट्रवादी आमदाराविरोधात भाजप नेत्याने शक्तिप्रदर्शनाने भरला अर्ज

BJP Leader Shivaji Patil Rebels Against Mahayuti: चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील यांनी महायुतीविरोधात बंड पुकारले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 28 October : चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील यांनी महायुतीविरोधात बंड पुकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांच्या विरोधातच त्यांनी दंड थोपटले आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी महायुतीला धक्का दिला आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये (Chandgarh Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली होती. मात्र, विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याने ही जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यानंतर भाजप नेते शिवाजीराव पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं.

मागील विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील (Shivaji Patil) यासह अन्य दोन उमेदवार चंदगडच्या रिंगणात होते. मात्र, शिवाजी पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आपल्याला विजयाचा विश्वास आहे, असा दावा करत त्यांनी बंडखोरी केली आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन करत शिवाजी पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील आणि त्यांची कन्या शिवानी शिंगाडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. चंदगड मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील, तर महाविकास आघाडीकडून नंदा बाभूळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी शिवाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगड येथे येऊन शिवाजी पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी शिवाजी पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी हजेरी लावल्याने कोल्हापुरात एकच चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT