Solapur, 28 October : माळशिरस मतदारसंघातून भाजपने अपेक्षेप्रमाणे आमदार राम सातपुते यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या आखड्यात उतरविले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या दोन यादीत नाव नसल्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राम सातपुते यांना उतरवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांना कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला मोहिते पाटील-सातपुते यांच्या राजकीय संघर्षाचा दुसरा अध्याय विधानसभा निवडणुकीत पहायला मिळणार आहे.
माळशिरस मतदारसंघातून (Malshiras Constituency) महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जानकर यांच्या पाठीशी या वेळी मोहिते पाटील यांची ताकद असणार आहे. जानकरांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसऱ्याच यादीत जाहीर झाली होती.
जानकरांना कोण आव्हान देणार, याची उत्सुकता वाढली होती. कारण, भाजपच्या दोन यादीत माळशिरसचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता. तिसऱ्या यादीत मात्र अपेक्षेनुसार राम सातपुते (Ram Satpute) यांना पुन्हा एकदा माळशिरसच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेत फडणवीसांनी मोहिते पाटील यांना कडवी लढत देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तालमीत तयार झालेले पहिलवान असून पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या सहकार्याने ते अवघ्या पंधरा दिवसांत आमदार झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढ्यातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे माळशिरस मतदार संघाचे भाजपचे गणित थोडेसे अवघड झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राम सातपुते यांनी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव झाला. मात्र, त्या पराभवाच्या अगोदर घडलेल्या घडामोडी ह्या मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यातील कटुता वाढवणाऱ्या ठरल्या आहेत.
उत्तम जानकर यांनाही लोकसभा निवडणुकीत गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला होता. मात्र, जानकर यांनी त्याला दाद न देता मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आमदारकीची उमेदवारी पदरात पाडून घेतली होती. आता त्याच उत्तम जानकर यांच्याशी दोन हात करण्यासाठी फडणवीसांनी आपल्या पट्टशिष्याला मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरसच्या मैदानात लंगोट लावून सोडले आहे.
मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. फरक एवढाच आहे की, मागच्या निवडणुकीत सातपुते यांच्या पाठीशी मोहिते पाटील होते, तर तर शरद पवार हे उत्तम जानकरांच्या पाठीशी उभे होते. त्या लढतीत अवघ्या 2590 मतांनी जानकरांचा पराभव झाला होता.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राम सातपुते यांनी माळशिरसमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी देवेंद्र फडणीसांनी अखेर आपल्या लाडक्या शिष्याला (राम सातपुते) पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. आता माळशिरसची जनता ही उत्तम जानकर यांच्या पाठीशी उभी राहते की पुन्हा एकदा सातपुते यांना आशीर्वाद देते, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.