Sujay Vikhe Patil, Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : थोरातांमध्ये दम, दानत अन् माणुसकी नाही; सुजय विखेंनी सगळंच काढलं

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऊसतोड महामंडळ स्थापन होऊन वसतिगृहासाठी पैसेही मंजूर झाले होते. मात्र साडेसात वर्षे महसूलमंत्री पद भूषवलेल्या माजी मंत्र्यांची ऊसतोड कामगारांसाठी काही करण्याची दानत नव्हती. त्यासाठी दम आणि माणुसकी लागले, असे म्हणत खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरांतांवर सडकून टीका केली.

पाथर्डी तालुक्यातील विविध विकासकामांचा प्रारंभ खासदार विखे यांच्या हस्ते व आमदार मोनिका राजळे उपस्थित झाला. यावेळी विखेंनी विकासकामाच्या जोरावरच येत्या लोकसभा २०२४च्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगून बाळासाहेब थोरातांचा कडक शब्दात समाचार घेतला.

"पाथर्डी तालुक्यातील हंडाळवाडी ऊसतोड कामगारांच्या मुले आणि मुलींच्या वसतिगृहांसाठी १५-२५ एकर जमीन नगरपरिषद राज्य सरकारच्या जमा केली आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे आहे. महाविकास आघाडीच्या काळात ऊसतोड महामंडळ स्थापन झाले. वसतिगृहासाठी पैसेही मंजूर झाले होते. मात्र नगरमधून मंत्री असतानाही या मुलांसाठी सरकारची जमीन देण्याची दानत त्यांनी दाखवली नाही. ते आम्ही करून दाखवले. हे करण्यासाठी दुसऱ्या कोणामध्ये दम नव्हता. समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी माणुसकी लागते", अशी टीका सुजय विखेंनी केली.

खासदार विखेंनी आपल्या स्टाईलमध्ये विरोधकांचा समाचार घेतना पाथर्डीसह नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. "अनेकांना नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची इच्छा आहे. परंतु स्वप्न पाहून शेवटच्या तीन महिन्यात कोणी निवडून येत नाही. त्यासाठी साडेचार वर्षे जमिनीवर राहावे लागते. डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. नगरपालिकेत येणे, मोर्चा काढणे, उपोषणाला बसून ते सोडवण्यासाठी कोणाला तरी बोलावणे, नाही आले तर स्वतःच पाणी पिणे याने काम होत नाही," असे टोलेही खासदार विखेंनी विरोधकांना लगावले.

खासदार बदलण्याची टीका करणाऱ्यांना विखेंनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, "दोन ठिकाणी भेटी दिल्यावर वातावरण चांगले आहे, असे वाटत असेल, तर जनेतमध्ये जाऊन पाहा. जनतेच्या मनामध्ये कोण बसले आहे, हे कळेल. दोन लोकांच्या भेटीगाठीने जिल्ह्याचा खासदार ठरत नाही आणि तो ठरणारही नाही. कोण काय बोलते याचा विचार करत नाही. गेली पंचवार्षिक सोपी नव्हती. एकच माणूस फिरत होता. या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण सर्वांचे प्रयत्न विफल केले आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणल्याचे," आठवणही खासदार विखेंनी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुन्हा येईन

'खासदारकीच्या माध्यमातून साडेचार वर्षे जमिनीवर राहिलो. डोळ्यात तेल घालून काम केले. हे माझ्यासाठी देखील सोपे नव्हते. जनतेच्या आशीर्वादामुळे कामे करू शकलो. पक्षाने परत संधी दिल्यास, तर परत एकदा आपल्यासमोर भाजपच्या वतीने मते मागण्यासाठी येईल. निवडणूक आली, तर नारळाची पोतेचे पोते सापडतात. परंतु महाराष्ट्रातील एकमेव खासदार असा आहे की, त्याने जनतेने दिलेली कामे वेळेत पूर्ण केली आहे. कोणतीच कामे अपूर्ण ठेवली नाही. खासदार-आमदारांचे डबल इंजिनचे हे सरकार आहे. हे थांबणार नाही,' असाही विश्वासही खासदार विखेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT