Solapur, 22 September : मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी आज जनसन्मान यात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याविषयी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर तटकरे यांनी नाव न घेता उमेश पाटील यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल. त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल,’ अशा शब्दांत तटकरे यांनी उमेश पाटील यांना सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जनसन्मान यात्रा मोहोळ शहरात झाली. या यात्रेच्या सभेत बोलताना आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी उमेश पाटील (Umesh Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात. माजी आमदार राजन पाटील आणि माझ्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर बोललं जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, अशी मागणी केली.
आमदार यशवंत माने यांनी केलेल्या तक्रारीची प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दखल घेतली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून 2014 ते 2018 दरम्यान काम केले आहे. आताही गेली वर्षभरापासून पुन्हा प्रदेशाध्यक्ष या पदावर काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिस्तीतच चालेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारासुद्धा संबंधितांना देतो. माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने यांना लक्ष्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल. त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच करेल, एवढा विश्वास देतो, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना नाव न घेता इशारा दिला.
यशवंत मानेंची काय होती तक्रार
सुनील तटकरे, तुम्ही शिस्तप्रिय आहात. बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तुम्ही दोघेही शिस्तप्रिय नेते आहात. पण, मोहोळ मतदारसंघात मी सांगू नये; पण सांगतो. आपल्या नावाचा वापर करून पक्षात बेशिस्त वर्तन करणाऱ्या संख्या वाढली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे.
आपण दिलेला उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार आहे; म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून माजी आमदार राजन पाटील, त्यांची दोन्ही मुले आणि माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत. आमच्याविषयी खालच्या पातळीची भाषा वापरली जाते. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे आणि आपण त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी आपल्या भाषणातून केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.