Uddhav Thackeray-Deepak Salunkhe-Dr. Babasaheb Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola News: ठाकरेंच्या गुगलीने महाआघाडीत पुन्हा खळबळ; सांगोल्यात मशाल की शेकाप?

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 October : सांगोला विधानसभा मतदारसंघ राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत दीपक साळुंखे यांनी मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी निर्माण होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सांगोला मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला मिळणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन मशाल हाती घेणाऱ्या साळुंखे यांना उमेदवारीची खात्री असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटली, तर महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्षाला (PWP) सांगोल्याची जागा सोडण्याचे सूतोवाच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी खासगीत अनेकदा सांगितली आहे, त्यामुळे ठाकरेंच्या गुगलीने महाविकास आघाडीत सांगलीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले दीपक साळुंखे यांनी आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ((Shivsena)) प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीच आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडलाे असल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते, त्यामुळे शिवसेनेकडून तिकिटाची खात्री असल्यामुळेच साळुंखे हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. दीपक साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले होते. विधानसभेला सांगोल्याची जागा शेकापला सोडण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, त्यामुळे महाविकास आघाडीत सांगोला मतदारसंघ शेकापकडे जाईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडींमुळे सांगोल्यावरून महाविकास आघाडीत वाद उफाळू शकतो.

शिवसेनेने ज्या पद्धतीने साळुंखे यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत, ते पाहता सांगोला मतदारसंघ शिवसेनेकडे जातो की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहणाऱ्या शेकापने सांगोला मतदारसंघावर दावा केला आहे, या मतदारसंघातून शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख हे इच्छुक आहेत.

महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा शेकापला सुटेल, अशी चिन्हे असतानाच गेल्या दोन दिवसांपसून घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यतव वर्तविण्यात येत आहे.

काय होऊ शकते?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने सांगोला मतदारसंघावरून अशीच आगळी केली होती त्यावेळी डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी संजय राऊत यांनी घोषित केली होती, त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिंकली होती. मात्र, त्यावरून महाविकास आघाडीत मोठे रामायण घडले होते.

अगदी तशीच परिस्थिती सांगोल्याच्या मतदारसंघावरून सध्या घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेला ही जागा सुटली, तर शेकापचे बाबासाहेब देशमुख हे बंडखोरी करणार आणि देशमुख यांना उमेदवारी मिळेल, तर दीपक साळुंखे हे शंभर टक्के निवडणूक लढवणार, हे उघड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT