Shivsena Minister Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंकडे गाववाल्यांनी केली ही मागणी...

महाबळेश्वरमधील सुशोभिकरणाचे मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री Dy CM अजित पवार Ajit Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

अभिजित खुरासणे

महाबळेश्वर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वरसाठी शंभर कोटींचा निधी मंजुर केला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षापेक्षा अधिक काळ येथील मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या प्रकल्पांच्या कामांना सुरवात करत असतानाच मुख्याधिकारी यांची बदली झाली. याची माहिती मिळताच महाबळेश्वरकरांनी आता तालुक्याचे भुमिपूत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले असून दादा आपण एव्हढं कराच, मुख्याधिकाऱ्यांची बदली थांबवा...अशी साद घातली आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन महाबळेश्वर हे देशातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण आहे. कै. बाळासाहेब ठाकरे यांचे महाबळेश्वर या पर्यटन स्थळावर नितांत प्रेम होते, म्हणुन ते वर्षातून एक दोन वेळा येथे विश्रांतीसाठी आवर्जुन यायचे. शिवसेना अशा वळणावर आली, संघटनेचा वारसदार ठरविण्याची वेळ आली. तेव्हा तो निर्णय घेण्यासाठी कै. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण निवडले ते म्हणजे महाबळेश्वर. येथेच शिवसेनेचा पुढील वारसदार म्हणुन उद्धव ठाकरे यांची निवड झाली.

शिवसेनेच्या इतिहासात महाबळेश्वरात घडलेल्या घटनेची नोंद सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. तेव्हा पासुन ठाकरे कुटुंब हे नियमित महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी आवर्जुन येतात. महाबळेश्वर येथे दरवर्षी साधारण वीस लाख पर्यटक भेट देतात. सलग सुट्ट्यां व हंगामात मोठया संख्येने येथे पर्यटक येतात. बाजारपेठ ही पर्यटकांच्या गर्दीला कमी पडते, रस्ता ओसंडुन वाहतात. एकमेकांना धक्का मारत पुढे जावे लागते. बाजारपेठेवर विजतारांचे जाळे, दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, रस्त्यांवर बसणारे पथारीवाले या सर्वांमुळे रस्ता कमी झाला आहे.

म्हणुनच बाजारपेठेचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आणि यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. गेली वर्षभर प्रशासनाने यावर काम केले. अनेक वेळा रात्रीचा दिवस करावा लागला, खुप धावपळ करावी लागली. महाबळेश्वर सातारा मुंबई असे खेटे घालावे लागले. मग आराखडा तयार झाला. कामाच्या निविदा निघाल्या व त्यापैकी काही मंजूऱ्या देखील झाल्या. एकीकडे प्रकल्पातील तांत्रिक काम व दुसरीकडे खाऊगल्ली उभारण्याचे काम सुरू झाले.

आता काही दिवसातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या सुशोभिकरणाचे भुमिपूजन होणार असे वाटत असतानाच मुख्याधिकारी यांची बदली झाली. या प्रकल्पाच्या निमित्ताने मुख्याधिकारी यांनी येथील जनतेला विश्वासात घेतले. शहरातील प्रत्येक घटकांबरोबर बैठका झाल्या. त्यामुळे महाबळेश्वरकरांबरोबर त्यांची नाळ जुळली आहे. त्यांना काय करायचे आहे ते त्यांच्या डोक्यात आहे. कागदावर जे आहे ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मुख्याधिकारी पल्लवी पाटील या सज्ज झाल्या आहेत. परंतु आता याला बदलीमुळे खो बसण्याचा धोका आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील महाबळेश्वर उभे करण्याची तयारी सुरू असतानाच बदली कशी काय होऊ शकते, असा प्रश्न महाबळेश्वरकरांना पडला आहे. प्रमोशनमुळे जर बदली झाली असेल तर दादा आपण ती थांबवा. काहीही करा जोपर्यंत महाबळेश्वरच्या बाजारपेठेचे सुशोभिरण होत नाही तो पर्यंत मुख्याधिकारी पल्लवी पाटील या येथे हव्या आहेत. दादा महाबळेश्वरकरांची ही मागणी आहे आणि आपण ती पुर्ण कराल हीच अपेक्षा आहे.

योगायोगाने राज्याचे नगरविकास खाते एकनाथ शिंदे (दादा) आपल्याकडेच आहे. शिवाय तुम्ही महाबळेश्वरचे भुमिपूत्र आहात म्हणुन हक्काने महाबळेश्वरकर तुमच्याकडे ही मागणी करतोय. दादा मुख्याधिकारी यांची बदली तुम्ही थांबवा, आज महाबळेश्वरकर मुख्याधिकारी यांना जो प्रतिसाद देत आहे तेवढाच प्रतिसाद येणारे मुख्याधिकारी यांना मिळेल याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता देखील नाकारता येईल. हा धोका ओळखुन तरी मुख्याधिकारी यांची बदली तुम्ही थांबवा. बदली जरी थांबविता आली नाही तरी महाबळेश्वर येथे कोणाची नेमणुक करू नका एव्हढं तर दादा तुम्ही करूच शकता, अशी साद महाबळेश्वरच्या जनतेने मंत्री एकनाथ शिंदेंना घातली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT