Pratap Sarnaik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pratap Sarnaik Solapur Tour : परिवहन मंत्र्यांची गाडी अनेकदा घसरली अन्‌ अधिकाऱ्यांवर कोसळली; ‘मी इथे असताना अधिकारी बाहेर जातातच कसे?’

Solapur Meeting News : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरमध्ये अचानक बैठक घेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांनी आरटीओला कठोर जाब विचारला, तर बैठकीतून उठून गेलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

अरविंद मोटे

1 अचानक बैठक व कडक सवाल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरमध्ये प्रमुख शासकीय अधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि विविध विषयांवर अधिकाऱ्यांना झापले.

2 अधिकाऱ्यांची गोंधळलेली स्थिती – बैठकीत उपस्थित नसलेल्या किंवा विषयासंबंध नसलेल्या अधिकाऱ्यांना देखील प्रश्न विचारल्याने अनेक अधिकारी गोंधळले; काहींना उत्तर देता आले नाही.

3 कडक शिस्त व चिडचिड – एसटी अधिकारी लघुशंकेसाठी बाहेर गेल्याचे कळताच सरनाईक संतापले व “मी येथे असताना अधिकारी बाहेर जातात म्हणजे काय?” असा जाब विचारला.

Solapur, 16 September : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (ता. 16 सप्टेंबर) सोलापूरमध्ये अचानकपणे प्रमुख शासकीय अधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मंत्री महोदयांनी बैठकीतच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. ऐनवेळी झालेल्या प्रश्नांच्या फैरीने अधिकारी गांगरून गेले आणि त्यांची बोलती बंद झाली.

मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी संबंध नसणाऱ्या अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतले, त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची अडचण झाली. बराच वेळ बैठकीला बसलेले एसटीचे अधिकारी लघुशंकेसाठी बाहेर गेले आणि तेवढ्यात मंत्र्यांनी त्यांच्याच नावाचा पुकारा केला. मात्र, ते बाहेर गेल्याचे सांगताच मंत्रिमहोदयाचा पारा चढला आणि ‘मी येथे असताना अधिकारी बाहेर जातात म्हणजे काय?’ असा जाब संबंधितांना विचारला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. धाराशिवला जाताना ते अनेकदा सोलापुरात (Solapur) येतात. मंगळवारी हे असेच सोलापुरात थांबले होते. त्यादरम्यान त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीचा निरोप अचानक आल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाली, त्यामुळे बिचारे आहे त्या परिस्थितीत शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले.

विषय पत्रिकेनुसार विषयांचे वाचन सुरू करण्यात आले. मराठवाड्यातून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या ५८ गावांचा प्रश्न समोर आला. हा विषय महसूल विभागाचा होता. पण, मंत्री महोदयांनी सामाजिक न्याय विभागाचे कोण आहे का? अशी विचारणा केली. महसूल विभागाचे अधिकारी मात्र शांत बसले. सामाजिक न्याय विभागाच्या महिला अधिकाऱ्यांनी धावत-पळत विश्रामगृह गाठले. तोपर्यंत बैठकीत पुढील विषयावर चर्चा सुरू झाली होती. खुर्ची मिळेल तिथे बसून त्या परतल्या. पण, त्यांना पुन्हा कोणी काहीही विचारलं नाही.

शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बांधकाम कामगारांना मिळणारी भांडी आणि साहित्य मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना एक हजार रुपये द्यावे लागतात. या साहित्याचे गोदाम शहराबाहेर असून त्यासाठी दोन दोन दिवस रांगेत थांबवे लागते, अशी तक्रार केली. मंत्री महोदयांनी बांधकाम विभागाचे कोणी आहे का, अशी विचारणा केली. उपस्थित अधिकाऱ्यांनीच एकमेकांच्या समजुतीने मंत्र्यांची चूक दुरुस्त करत कामगार उपायुक्तांना समोर केले.

मग पुढे आला कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील नाक्यांचा विषय. तेथे मंत्री महोदय स्वत: पाहणी करून छायाचित्रे घेऊन आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांनी असे काय झापले की त्यांची बोलतीच बंद झाली. नाक्यावरून २४ तासांत किती गाड्या पास होतात. यापैकी किती गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन असते.

किती गाड्यांवर तुम्ही कारवाया करता आणि सोडता ते सांगा. मंत्र्यांच्या या प्रश्नांच्या फैरीने अधिकाऱ्याची ‘त त प प’ झाली. नाक्यावर साध्या वेशातील कर्मचारी कोण होते. ते तगडे जवान कोण आहेत, असेही प्रश्न मंत्री सरनाईक यांनी विचारले. मात्र, अधिकारी त्यावर उत्तर देऊ शकले नाहीत.

बैठक बराच वेळ रंगली होती, त्यामुळे बैठकीत अनेक वेळापासून बसून असलेले एसटीचे अधिकारी लघुशंकेसाठी बाथरुमला गेले अन्‌ तेवढ्यात एसटीचा विषय निघाला. मंत्री महोदयांनी एसटीच्या अधिकाऱ्यांचा पुकारा केला, ते बिचारे बाथरूममध्ये होते. ‘ते बाहेर गेले आहेत,’ असं कुणीतरी सांगितलं आणि मंत्री महोदयांचा पारा चढला. ‘मी येथे असताना अधिकारी बाहेर जातात म्हणजे काय?’ अशी त्यांनी विचारणा केली. आता बाहेर म्हणजे ते बाथरुमला गेले आहेत हे सायबांना कुणी सांगायचे? असा प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांना पडला हेाता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT