Satara News : भारतीय जनता पक्षाला सातारा लोकसभेची जागा लढवण्याची संधी मिळाली, तर खासदार उदयनराजे भोसले हे मागील वेळी पक्षाच्या चिन्हावर उभे राहून विजयापर्यत पोचू शकले नाहीत. ही सल भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. भाजपला हा मतदारसंघ मिळाला आणि उमेदवारासाठी शिफारस करण्याची वेळ आली तर उदयनराजे हेच भाजपचे उमेदवार असावेत, असे माझे मत आहे. पण, ही जागा कोणाला मिळेल, पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देतील, हेही अद्याप स्पष्ट नाही. कार्यकर्ता म्हणून उदयनराजेंनाच तिकीट द्यावे, असे मला वाटते, असे भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी सांगितले. (Udayanraje should get ticket from Satara Lok Sabha Constituency: Atul Bhosle)
भोसले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम बघून, देशाचा प्रवाह बघून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार व सहकारी महायुतीत आले. या तीनही पक्षात ज्या जागा ज्यांच्याकडे आहेत, त्या जागा त्यांना देण्यात याव्यात, ज्या जागावर कोणत्या पक्षाला उमेदवार निवडून येईल, असे वाटत असेल तर त्या जागांची मागणी करायची, असे ठरले आहे. मात्र, महायुतीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, हे अद्याप ठरलेले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातारा लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, अशी आमची मागणी आहे. तेथे मागील वेळी खासदार उदयनराजे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. पक्षाचे संघटन चांगले आहे. भारतीय जनता पक्षाला अनुकुल वातावरण आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे भाजपला जागा मिळावी, असे आमचे म्हणणे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साताऱ्याची जागा आम्हीच लढवणार असे सांगितले आहे. त्यामुळे महायुतीत जे ठरले, वरिष्ठ जे सांगतील त्याचे काम आम्ही करणार आहोत. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भाजपला जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळणार, याचा अद्यापही पत्ता नाही. शिवसेना शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजप साताऱ्याच्या जागेवर दावा करत आहेत. मात्र नेमकी जागा कोणाला मिळेल हे सांगता येत नाही, असेही अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदींना २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी जे-जे काय करायचे ते-ते करायचे अशी भारतीय जनता पक्षाची मानसिकता आहे. त्यामुळे जे पक्ष ठरवेल, त्याप्रमाणे आम्ही काम करू. भारतीय जनता पक्षाला सातारा लोकसभेची जागा लढवण्याची संधी मिळाली तर खासदार उदयनराजे हेच भाजपचे उमेदवार असले पाहिजेत, असे माझे ठाम मत आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.