Ram Satpute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राम सातपुतेंचा संकल्प

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 April : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी फेटा बांधून घेणार नाही. अगदी निवडून आल्यानंतरही मी फेटा बांधणार नाही, असा संकल्प सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

आमदार राम सातपुते (Ram Satpute) हे सोलापूरमध्ये (Solapur) माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना फेटा बांधून न घेण्याचे कारण विचारले असता आमदार सातपुते यांनी आपला संकल्प जाहीर केला. ते म्हणाले की, मी शनिवारी मोहोळ (Mohol)तालुक्याच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्या दौऱ्यात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मला काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरे मी दिली. पण त्यांच्यासमोरच मी संकल्प घेतला आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न सुटत नाही. मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी फेटा बांधून घेणार नाही, असा संकल्प त्यांच्यासमोरच केला, असे सातपुते यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी आमदार राम सातपुते जाणार होते. त्या ठिकाणी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते. मोहोळ तालुक्यातील काही नेते त्या ठिकाणी पोचले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी त्या नेत्यालाही जाब विचारला होता. त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

वडवळ येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी ‘राम सातपुते चले जाव’ अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच, स्थानिक नेत्यांनाही विरोध दर्शविला होता, त्यामुळे आमदार राम सातपुते यांना वडवळऐवजी इतर ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ करावा लागला होता. त्यानंतर या घटनेवरून तालुक्यात राजकारण रंगले होते.

वडवळ येथे गोंधळ घालणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना तालुका प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्या प्रकरणी आपण तहसीलदारांना आपण कोणतेही आदेश दिले नव्हते, असे स्पष्टीकरण आमदार राम सातपुते यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सातपुते यांनी घेतलेल्या संकल्पाची विशेष चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT