Tanaji Sawant-Pooja Markad
Tanaji Sawant-Pooja Markad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant Sugar Factory : आरोग्यमंत्र्यांच्या कारखान्याला सरपंचांनी दाखवला हिसका; 12 लाखांच्या कराची नोटीस

​अण्णा काळे

Karmala News : ग्रामपंचायतीचा कर न भरणाऱ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विहाळ (ता. करमाळा) येथील ‘भैरवनाथ शुगर’ कारखान्याला सरपंचांनी हिसका दाखवला आहे. ‘भैरवनाथ शुगर’ने 2011 पासून करापोटी ग्रामपंचायतीला एकही रुपया भरलेला नाही. त्यामुळे विहाळ ग्रामपंचायतीने 12 लाख 76 हजार 384 रुपये कर तातडीने भरावा, अशी नोटीस कारखान्याला पाठवली आहे. कराची मागणी केली तर गावातील कामगारांना काढून टाकण्याची धमकी आरोग्यमंत्र्यांच्या कारखान्याकडून देण्यात येत असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. (Vihal Gram Panchayat sent 12 lakh tax notice to Bhairavanath Sugar Factory of Health Minister)

विहाळ गावच्या सरपंच पूजा मारकड यांनी सांगितले की, भैरवनाथ शुगर हा कारखाना विहाळ हद्दीत येतो. कारखान्याने 2011 पासून ग्रामपंचायतीचा रीतसर करही भरलेला नाही. विशेष म्हणजे कारखान्याची विहाळ ग्रामपंचायतीमध्ये 2023 पर्यंत नोंदही झालेली नाही. या वर्षी आम्ही ती नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरी केली. ग्रामपंचायत दफ्तरी नोंद होऊ नये, यासाठी कारखाना प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले. मात्र, आम्ही तो दबाव झुगारून आम्ही संपूर्ण कारखाना आणि कारखान्याशी संबंधित बांधकामाच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये लावल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामपंचायतीचा कर भरणे बंधनकारक असतानाही भैरवनाथ शुगर कारखान्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली आहे. भैरवनाथ शुगरने ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर आतापर्यंत थकवला आहे. वास्तविक कारखान्याला ग्रामपंचायतीचा कर भरून गावच्या विकासाला मदत करता आली असती पण, कारखान्याने आतापर्यंत कर भरणे टाळले आहे.

भैरवनाथ शुगर कारखान्याला विहाळ ग्रामपंचायतीने 12 लाख 76 हजार 384 एवढी रक्कम भरण्याची नोटीस पाठवली आहे. कारखान्याने वेळेत कर न भरल्यास विहाळ ग्रामपंचायत न्यायालयात जाण्याच्या भूमिकेत आहे, असेही सरपंच पूजा मारकड यांनी स्पष्ट केले.

विहाळ ग्रामपंचायतीने भैरवनाथ शुगरला कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. ग्रामपंचायतीने कर मागितला तर आम्ही कारखान्यात काम करणाऱ्या विहाळमधील कामगारांना कामावरून काढून टाकू, अशी धमकी कारखाना प्रशासनाकडून दिली जात आहे. गावातील कामगार आणि ग्रामपंचायतीचा कर हे दोन वेगळे विषय आहेत. आम्ही कारखान्याला कर भरण्यासाठी विनंती करत आहोत. पण त्यांनी वेळेत कर भरला नाही तर आम्ही कायदेशीरित्या कारवाई करू, असा इशारा विहाळच्या सरपंच पूजा मारकड यांनी दिला.

सरपंच मारकड म्हणाल्या की, भैरवनाथ शुगर साखर कारखाना सुरू झाल्यापासून त्यांनी सर्व कर वेळेत भरणे बंधनकारक होते. मात्र, त्यांनी तब्बल 11 वर्षे कर भरलेला नाही. कारखान्याने थकवलेला सर्व कर व्याजासह वसूल करण्यासाठी करमाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे कायदेशीर मार्गदर्शन मागवले आहे.

Edited By-Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT