Girish Mahajan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahajan Meet Mohite Patil : विजयदादांची नाराजी परवडणारी नाही; गिरीश महाजनांची अकलूजमध्ये जाहीर कबुली

Vijaykumar Dudhale

Solapur News : माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज आहेत. त्यांची नाराजी परवडणारी नाही. त्यांची नाराजी मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालेन. ते विजयदादांशी बोलतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विजयदादा यांची भेट होईल आणि त्यानंतर माढ्याच्या उमेदवारीसंदर्भातील पुढचा निर्णय होईल, असे भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

मोहिते पाटील यांची नाराजी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांना तातडीने अकलूजला पाठविले आहे. तत्पूर्वी सकाळी मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार नारायण पाटील, जयवंतराव जगताप यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर महाजन (Girish Mahajan) हे विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite patil) यांना भेटले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी मोहिते पाटील यांच्या नाराजीवर भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आज मी अकलूजमध्ये आलो आहे. आमचं फोनवर बोलणं झालं होतं. देवेंद्र फडणवीस, मी आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये माढ्याच्या उमेदवारीवरून चर्चाही झाली आहे. फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार मी विजयदादांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आलो होतो.

विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी दूर करायला मी आलेलो नाही. फक्त त्यांच्या भावना काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी अकलूजमध्ये आलो आहे. आता मी मुंबईला जाऊन फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा करेन. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याचा अधिकार मला नाही. तो अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला आहे. काही ठिकाणी नाराजी असते. माढ्यात विजयदादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही, म्हणून मला मुद्दामहून फडणवीस यांनी अकलूजला (Akluj) पाठविले आहे. पक्षश्रेष्ठींच्या कानावर मी येथील सर्व गोष्टी घालेन, असे गिरीश महाजन यांनी नमूद केले.

ते म्हणाले, उमेदवाराच्या नावावर कुठेही एकमत होत नसते. मात्र माढ्यातील नाराजी मोठी आहे, त्यामुळे मी कुठेही न जाता थेट विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटायला अकलूजमध्ये आलो आहे. दादांचे पक्षात मोठे वजन आहे. माझी विजयदादा आणि सर्व कुटुंबीयांशी चर्चा झाली आहे. ती सर्व चर्चा मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवेन. मला आता कोणताही शब्द देता येणार नाही. नाही तर मीच अडचणीत येईन. पण, आमची चर्चा सकारात्मक झाली आहे.

माढ्याची उमेदवारी देण्यापूर्वी चर्चा झाली हेाती, सर्व्हेही झाले होते. मात्र, एवढा मोठा वाद आणि रोष असेल असे आम्हालाही वाटले नव्हते. मात्र, आज या ठिकाणी आल्यानंतर नाराजीची तीव्रता लक्षात आली. या नाराजीची दखल निश्चितपणे पक्षश्रेष्ठी घेतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी बोलून दाखवला.

माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर करताना मोहिते पाटील यांना डावलण्याचा कोणताही पक्षाचा हेतू नव्हता. कोणावरही कुरघोडी होणार नाही, याची पक्ष काळजी घेत असतो. मोहिते पाटील यांच्या ताकदीकडे भाजपकडून दुर्लक्ष केले जात नाही. मी विजयदादांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर झाली, असे मी म्हणणार नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी बोलतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT