Vijaykumar Deshmukh-Mahesh Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur City North : विजयकुमार देशमुख-महेश कोठे पुन्हा एकदा सामना रंगणार?

Assembly Election 2024 : विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यामध्ये 2009 मध्ये आमना सामना झाला होता. त्यात देशमुख यांना 62 हजार 363 मते मिळाली होती, त्यांना महेश कोठे यांनी जोरदार लढत दिली होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 October : विरोधाच्या अडथळ्याची शर्यत पार करून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पक्षाची पाचव्यांदा उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. आता भाजपकडून विद्यमान आमदार देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली असून महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची शक्यता आहे.

या पक्षाकडून माजी महापौर महेश कोठे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, त्यामुळे देशमुख-कोठे यांच्यात 2009 नंतर पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, या मतदारसंघात दुरंगी की तिरंगी लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) हे 2004पासून सलग चार वेळा सोलापूर शहर उत्तर मतदासंघातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा मागील तीन निवडणुकीतही देशमुखांनी भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम केले आहे.

पण, या वेळी देशमुख यांच्या उमेदवारीला भाजपच्या (BJP) माजी महापौर, माजी सभागृह नेते आणि सात माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती.

भाजपमधील नेत्यांबरोबच महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड मिलिंद थोबडे यांनीही विजयकुमार देशमुख यांच्यावर हल्लाबोल करत भाजपकडे उमदेवारीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, सर्वांचा विरोध डावलून भाजपने पुन्हा एकदा देशमुख यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

महाविकास आघाडीत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. या पक्षाकडून माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांना उमेदवारी मिळण्याची 99 टक्के शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून कोठे यांना उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात कोठे विरुद्ध देशमुख अशी लढत होऊ शकते.

विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यामध्ये 2009 मध्ये आमना सामना झाला होता. त्यात विजयकुमार देशमुख यांना 62 हजार 363 मते मिळाली होती, त्यांना महेश कोठे यांनी जोरदार लढत दिली होती. त्यात लढतीत कोठे यांना 52 हजार 273 मते मिळाली होती. कोठे यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी करत 14 हजार 624 मते घेतली होती.

देशमुख आणि कोठे यांच्यातील 2009 मधील निवडणुकीत कोठे यांनी देशमुखांच्या नाकीनऊ आणले होते. मात्र, कोठे यांचा 10 हजार 090 मतांनी पराभव झाला होता. आघाडीचा धर्म पाळून सपाटे यांनी बंडखोरी केली नसती तर कोठे यांनी विजयाला गवसणी घातली असती. मात्र, सपाटे यांनी बंडखोरी करत घेतलेल्या 14 हजार 624 मतांनी कोठे यांची आमदारकी संधी हुकवली होती. ती पुन्हा यंदा मिळू शकते.

पुन्हा सपाटेंचा अडथळा?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेश कोठे यांना सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, माजी महापौर मनोहर सपाटे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी न मिळाल्यास सपाटे हे बंडखोरी करणार की पवारांचे ऐकून कोठे यांना मदत करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT