Hatkanangale council Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangale Election : हातकणंगले उपनगराध्यक्ष निवडीत व्हीप डावलला; महाआघाडी काय भूमिका घेणार?

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीच्या हातकणंगले प्रमुखांनी व्हीप जारी केल्यानंतरही आघाडीतीलच एका अपक्ष सदस्याने मतदानाला दांडी मारली.

Rahul Gadkar

Kolhapur News : नुकत्याच झालेल्या हातकणंगले नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने लागू केलेला व्हीप आघाडीतीलच एका सदस्याने धुडकावून लावला. तो उपनगराध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहिल्याने त्याच्यावर कारवाई होणार का? आणि झालीच तर कारवाईचे धाडस कोण दाखवणार, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. हातकणंगले नगरपंचायतीमध्ये प्रथमच अशी घटना घडल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Violation of Whip by a member of Mahavikas Aghadi in Hatkanangale sub-president election)

हातकणंगले नगरपंचायतीमध्ये गेली चार वर्षे महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामध्ये शिवसेना सात, कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी एक आणि तीन अपक्ष अशा १२ जणांचा समावेश आहे. भाजपचे पाच सदस्य विरोधी बाकावर आहेत. पहिल्या तीन उपनगराध्यक्ष निवडीत फारशा मोठ्या घडामोडी झाल्या नाहीत. मात्र, चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडीदरम्यान मोठी राजकीय उलथापालथ होऊन महाविकास आघाडीतीलच काही जण विरोधकांना जाऊन मिळाल्याने महाविकास आघाडीला हार पत्करावी लागली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील वेळी झालेला पराभव लक्षात घेऊन महाविकास आघाडी या वेळी सावध झाली होती. आघाडीचे अध्यक्ष विजय खोत आणि गटनेत्या प्राजक्ता उपाध्ये यांच्या सहीने व्हीप जारी करण्यात आला होता, त्यानुसार आघाडीने ठरवून दिलेल्याच उमेदवाराला मतदान करणे बंधनकारक होते. याचे उल्लंघन केल्यास किवा दुसऱ्या उमेदवारांस मतदान करणे अथवा गैरहजर राहिल्यास संबंधितावर कारवाई होऊन त्याचे सदस्यत्व रद्द केले जाईल, असे त्या पक्षादेशामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या हातकणंगले प्रमुखांनी व्हीप जारी केल्यानंतरही आघाडीतीलच एका अपक्ष सदस्याने मतदानाला दांडी मारली. त्या सदस्याने पक्षादेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई होणार का आणि केलीच तर कारवाईचे धाडस कोण दाखवणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT