सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांसाठी उद्या मतदान होणार असून भाजप विरुद्ध शिवसेना असा महायुतीतील थेट सामना बहुतेक ठिकाणी दिसतो आहे.
अनेक नगरपरिषदांमध्ये स्थानिक पातळीवरील गट, माजी आमदार आणि प्रभावशाली घराण्यांमधील लढतीमुळे स्पर्धा चुरशीची झाली आहे.
मतदारांना ओळखपत्रांसाठी विविध सरकारी पुरावे चालणार असून मतदान केंद्रात मोबाईल नेण्याचा अंतिम निर्णय केंद्राध्यक्ष घेणार आहेत.
Solapur, 01 December : सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांसाठी उद्या (ता. ०२ डिसेंबर) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होणार आहे. मंगळवेढ्याची नगराध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवकांची, तर मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मैंदर्गी येथील काही प्रभागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. बहुतांश नगर परिषदांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा महायुतीमधील दोन मित्रपक्षांमध्ये सामना होताना दिसत आहे. सांगोल्यात शिवसेनेने, तर पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीने, बार्शी ठाकरेंच्या शिवसेनेने, तर अकलूजमध्ये मोहिते पाटील यांनी भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
जिल्ह्यातील चार लाख ४३ हजार मतदार उद्या ४९९ केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस अंमलदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ४९९ केंद्रांवर दोन हजार ७०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जाहीर झालेल्या ११ नगरपरिषदांपैकी मंगळवेढ्याची नगराध्यक्षांसह २० नगरसेवकांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे. याठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच, मोहोळ, सांगोला नगर परिषदेतील (Nagar Parishad) प्रत्येकी दोन आणि मैंदर्गी व पंढरपूर नगर परिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठीही २० डिसेंबरला मतदान होणार आहे.
बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांना आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कडवे आव्हान उभे केले आहे. या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेने बेरजेचे राजकारण करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार घेऊन त्याला उमेदवारी दिली आहे.
पंढरपुरात भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या रुपाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे. भालके यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद मतात रुपांरित झाला तर परिचारकांच्या गडाला हादरा देणारा ठरू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
अकलूजमध्ये भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे करून मोहिते पाटील यांना ललकारले आहे. दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोहिते पाटील यांच्या माध्यमातून तोडीस तोड आव्हान दिले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढतीपैकी अकलूजची लढत मानली जाते. करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगतापांनी धनुष्यबाण हाती घेत भाजपशी जोरदार लढत देत आहेत.
सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील हे भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादी या युतीशी टक्कर देत आहेत. येथील नगराध्यक्षपदाची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गीत भाजप आणि शिवसेनेचा थेट सामना होत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कुर्डूवाडीत मात्र ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत लढत होत आहे. मोहोळमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीने भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.
मतदानासाठी यापैकी कोणताही एक पुरावा ठेवा जवळ
पासपोर्ट, वाहनपरवाना, पॅनकार्ड, नोकरदार कर्मचाऱ्याचे फोटो ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बॅंक अथवा पोस्ट ऑफीसमधील खातेदाराचे फोटो असलेले पासबुक, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खत (फोटासहित), शस्त्र परवाना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील फोटो ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्याचे फोटो असलेले पासबूक, निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवांचे फोटो असेलेले प्रमाणपत्र, केंद्राच्या श्रम मंत्रालयाचे आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड, शिधापत्रिका (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक), शिधापत्रिकेवर एकच नाव असल्यास स्वत:च्या वास्तव्याचा अन्य पुरावा (वीजबिल, दूरध्वनी बिल, प्रॉपर्टी कार्ड किंवा घरपट्टी भरल्याची पावती), आधार ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र चालणार आहे.
मोबाईलचा निर्णय मतदान केंद्राध्यक्ष घेणार
मतदानाला जाताना मतदारांना आपला मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेर ठेवावा लागणार आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पण, त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार मतदान केंद्रावरील केंद्राध्यांना असणार आहेत.
उद्या सकाळी ७.३० ते सायं ५.३० दरम्यान मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील ४.४३ लाख मतदार मतदान करणार आहेत.
अधिकांश नगरपरिषदांमध्ये भाजप व शिवसेनेत थेट सामना आहे.
पासपोर्टपासून आधारकार्डपर्यंत विविध सरकारी फोटो ओळखपत्रांपैकी एक पुरावा चालेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.