Mumbai, 01 February : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ती जागावाटपाची बैठक होती, असे म्हटलं आहे. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितले नसते का, असे सवाल उपस्थित करून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा गुंता वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे, त्यावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ‘आम्ही शस्त्र खाली टाकून शरणागती पत्करायला गेलो नाही. मनं जुळविण्यासाठी प्रयत्न केला,’ असे स्पष्टीकरण दिले आहे.
आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांची दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे, अशी इच्छा होती. मात्र, त्यांची ती इच्छा अंतिम ठरली आहे. अजितदादांनी ही जी भावना व्यक्त केली होती. ती मी आजही प्रमाणिकपणे सांगतो. अजितदादा किती भावनिक होते, हे सगळ्यांना माहिती आहे.
मला शरद पवार यांच्या उपस्थितीतच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रिकरण करायचं आहे, असे दादांचे म्हणणे होते. त्यावर आता ती बैठक विलिनीकरणाबाबत नव्हती तर जागा वाटपाबाबत होती, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हटले आहे.
विलिनीकरणासंदर्भात ती बैठक नव्हती तर मग एक प्रश्न उपस्थित करतो की, झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार उभे केला ना? आम्ही घड्याळावर उमेदवार उभे का केले, तर आमच्यात तसं ठरलं; म्हणूनच केले ना? असा सवाल शिंदे यांनी केला आहे.
ते म्हणाले, जाऊद्या ह्या विषयाचा आम्हाला काय राजकीय फायदा करायचा नाही. ज्यांना कोणाला राजकीय मनसुबे रचायचे आहेत, ते त्यांना रचूद्या. याबाबत आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नये. अजितदादा गेल्यानंतर आम्हाला कुठलाही राजकीय फायदा उचलायचा नाही. शरद पवार हे शरद पवार आहेत, त्यांनी दुसऱ्या दिवसांपासून फिरायला सुरुवात केली. ते लढणारे योद्धे आहेत. तीच आमची प्रेरणा आहे. आम्ही शस्त्र खाली टाकून शरणागती पत्करायला गेलो नाही. मनं जुळविण्यासाठी प्रयत्न केला.
कुटुंब आणि पक्षाचं विभाजन झाल्यानंतर मतविभागणीमुळे होणारा तोटा नगरपालिका निवडणुकीत अजितदादांनी जाणला आणि ते काय नाही म्हणतात? सुनील तटकरेंशी चर्चा झाली होती, माझी चर्चा झाली होती. ते म्हणतात की जागा वाटपाबाबत चर्चा झाली असेल. ठीक आहे, तुम्ही एकदा तुमची भूमिका स्पष्ट करा आणि हा विषय एकदा संपवून टाकावं, असं मला वाटतं. ह्या चर्चेमुळे विनाकारण आमच्या पक्षाचं मनोधैर्य खचू लागलं आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.