Navodita Ghatge-Sheetal Farakte Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Malaysia Parcel Case : कागलचं राजकारण ढवळून काढणाऱ्या त्या ‘पार्सल’चं पुढं काय झालं?

Rahul Gadkar

Kolhapur, 02 July : लोकसभा निवडणुकीत कागलमधून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना कमी मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू आहे. त्यातच समरजित घाटगे यांच्या पत्नी नवाेदिता घाटगे यांची मलेशियाच्या पार्सलवरून झालेल्या वीस लाखांच्या फसवणुकीनंतर पुन्हा एकदा कागलचे राजकारण तापले आहे.

नवाेदिता घाटगे (Navedita Ghatge) यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगत त्यांच्याकडून वीस लाख रुपये उकळल्याची माहिती आहे. त्याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघातील हे प्रकरण पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरले आहे. त्या पार्सलमध्ये नेमकं काय होतं? असा सवालच हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान, या संबंधित सर्व प्रकाराचा पोलिसांकडून तपास सुरू असून ते पार्सल नेमकं काय होतं? याचा शोध अजून लागू शकलेला नाही. त्याचाच आधार घेऊन राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन राजकीय वातावरण तापवलं आहे.

दरम्यान, या घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन नवोदिता घाटगे यांनी केल्यानंतर कागलच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे.

राष्ट्रवादीच्या फराकटेंचं पोलिसांना निवेदन

नवोदिता घाटगे या २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये अर्धसत्यच बाहेर आल्याचे सांगत आहेत. त्यामुळेच आमचा प्रयत्न पूर्णसत्य बाहेर येण्यासाठीच आहे, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जोपर्यंत आरोपींच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत, घाटगेवहिनीसाहेब यांना न्याय मिळत नाही; तोपर्यंत या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत. लवकरात लवकर योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास प्रसंगी सर्वपक्षीय महिलांचा मोर्चाही काढू, असा इशाराही फराकटे यांनी दिला आहे.

या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रश्नच नाही. आमचाही तसा प्रयत्न नाही. तुम्ही मात्र आमच्या नेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीत आणण्यासाठी काय-काय आकांडतांडव आणि खटाटोप केले आहेत, हे संबंध जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहित आहे. फसवणूक झाली म्हणून तुम्ही पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तुम्हाला पाठिंबा देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. त्या प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा आमचा प्रयत्न नाही, असेही शीतल फराकटे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT